दहा मजुरांना काढले सुखरूप बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:40 PM2018-07-07T22:40:27+5:302018-07-07T22:41:02+5:30
नजीकच्या शेडगाव आजदा (पाटी) मार्गावरील अशोक पटेल यांच्या डेरीफार्ममध्ये कामानिमित्त गेलेले दहा मजुर वणा नदीच्या पुरामुळे डेरीफार्ममध्ये अडकले होते. त्यांना रेस्क्यू चमुने मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाअंती सुखरुप बाहेर काढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : नजीकच्या शेडगाव आजदा (पाटी) मार्गावरील अशोक पटेल यांच्या डेरीफार्ममध्ये कामानिमित्त गेलेले दहा मजुर वणा नदीच्या पुरामुळे डेरीफार्ममध्ये अडकले होते. त्यांना रेस्क्यू चमुने मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाअंती सुखरुप बाहेर काढले आहे.
गुरूवारीच्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवला. अशातच शुक्रवारी पटेल यांच्या डेरी फार्मवर दोन महिलांसह चार पुरुष मजुर तसेच गुजरात वरुन ट्रकने आंब्याच्या कलमा घेऊन आलेले चार मजुर असे एकूण दहा मजुर गेले होते. दरम्यान मुसळधार पावसामुळे वणा नदी दुथडी भरून वाहण्यास सुरूवात झाली. बघता-बघता पटेल यांच्या डेरीफार्मला पुराच्या पाण्याने वेडा घातला. अशातच जीव वाचविण्यासाठी सदर मजूर डेरीफार्मच्या छतावर चढले; पण पुराचे पाणी कमी होई ना. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी हतबल झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जीव वाचविण्यासाठी जीवाचा आटापीटा केला. दरम्यान घटनेची माहिती तहसीलदार दीपक करंडे, नायब तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, समुद्रपूरचे ठाणेदार प्रविण मुंडे, अजय साबळे, प्रा. मेघश्याम ढाकरे, बादल वानकर यांना मिळाली. त्यांनी रेस्क्यू चमुला माहिती देत घटनास्थळ गाठले. रेस्क्यू चमुतील सदस्यांनी बोटीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या जितु बेन (२५), लाला मेहेर (२५ ), सोनाली देवारे (३३), गुणवंती देवारे (२८), अरुण हिल्लारे (१९), अजय कलाडीया (२२), हसन सादा (४८), ललितचंद वाघेला (२७), साजिद अहमद सादी (३५), बिरज पवार (२९) यांना सुखरुप बाहेर काढले.
११० गाय-वासरे बेपत्ता
वणा नदीच्या पुरात अडकलेल्या दहा मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले; पण ११० गाय-वासरे या पुरात बेपत्ता झाले. यामुळे सदर पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
एसडीपीओ प्रदीप मैराळे, तलाठी विक्रांत वानकर, जीवन कोडापे, शंकर काळे, राम काळे, बंडु आसोले, ललित गौरकर, हिरामण बाभुळकर, नामदेव ढोकपांडे, राजु ढाले, उमेश पोटे, यलोर, कुरुडे, जनघरे, प्रकाश भोयर आदींनी पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले.
गाळ व काळोखाने वाढविली होती अडचण
पुराच्या पाण्यात अडकलेल्या दहा मजुरांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रेस्क्यू चमुला काळोख व गाळामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खुल्या जागेपासुन डेरीफार्म सुमारे ३ कि.मी.वर होते. अनेक अडचणी येत असल्याने मध्यरात्री बंद केलेले रेस्क्यू आॅपरेशन थांबवून शनिवारी पहाटे पुन्हा सुरू करून पूरात अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढले.