शहरातील दहा पानठेले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 09:52 PM2018-07-17T21:52:26+5:302018-07-17T21:53:26+5:30
सुगंधित तंबाखू, स्वीट सुपारी, पान मसाला आदी अन्नपदार्थांची विक्री, निर्मिती, वितरण, साठवणूक याकरीता २०१२ पासून प्रतिबंधीत केलेले आहे. खर्रा व तत्सम अन्नपदार्थांचा विक्रीकरिता साठा केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन वर्धाच्या चमुने अचानक धाड टाकून ...........
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुगंधित तंबाखू, स्वीट सुपारी, पान मसाला आदी अन्नपदार्थांची विक्री, निर्मिती, वितरण, साठवणूक याकरीता २०१२ पासून प्रतिबंधीत केलेले आहे. खर्रा व तत्सम अन्नपदार्थांचा विक्रीकरिता साठा केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन वर्धाच्या चमुने अचानक धाड टाकून पान शॉप मधून सुगंधित तंबाखु व खर्रा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेली मशीन जप्त करून दहा पानठेल्यांना सीलबंद करण्यात आले.
शासनाने राजपत्राद्वारे सुगंधीत तंबाखू पान मसाला, स्वीट सुपारी आदी अन्नपदार्थ विक्री, निर्मिती, वितरण, साठवणूक करीता २०१२ पासून प्रतिबंधीत केलेले आहे, असे असताना सुध्दा चोरट्या पध्दतीने सुगंधीत तंबाखू, खर्रा, पान मसाला, गुटखा यांची विक्री व साठवणूक होत असल्याचे आढळून आलेले आहे. शहरातील विविध पान शॉपवर प्रतिबंधीत अन्न पदार्थ खर्राची विक्री होत असल्याचे आढळून आले. सदर पान शॉप अवैधपणे खर्रा विक्री करीत असल्यामुळे तसेच खर्रा तयार करण्याकरिता मशिनचा वापर करीत असल्यामुळे शहरातील १० पानठेल्या मधून प्रतिबंधीत अन्न पदार्थ जप्त करून पान ठेल्याना सीलबंद करण्यात आले. सदर कारवाई शहरातील विविध भागात कारवाई करण्यात आली.
सदरची संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) तथा पदावधीत अधिकारी जी.बी. गोरे, अन्न सुरक्षा अधिकारी ललीत सोयाम, रविराज धाबर्डे, घनश्याम दंदे यांच्या चमूने एकत्रितपणे केली.
सदर कारवाई साठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची मदत पुरविली होती. वर्धा जिल्हा दारूबंदी असल्याने येथे गुटखा, तंबाखू याची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अशा कारवाया वारंवार करण्याची गरज आहे. खºयाच्या किंमतीवरही नियंत्रण राहिलेले नाही.
या पानठेल्यांवर झाली कारवाई
अंबिका पान शॉप, सोशालिस्ट चौक, बंधू पान मंदिर, बस स्थानक, संदीप मानिककुळे यांचा पान ठेला गोरस भंडार जवळ, मेघश्याम जनार्दनराव वाघ यांचा पानठेला सेवाग्राम रोड, शेख पान सेंटर बजाज चौक, फिरोज पानशॉप दयाल नगर, आकाश पानशॉप सोशालिस्ट चौक, मधुसूदन पान सेंटर बोरगाव (मेघे), विठ्ठल रुख्माई पान सेंटर कारला रोड, व न्यू तांबूल पानशॉप कारला चौक यांच्यावर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून एकत्रितपणे रू. ५६ हजार १०० रूपयाचा साठा जप्त करण्यात आला असून सर्व पानशॉप पुढील आदेशापर्यंत सीलबंद करण्यात आले आहे.