उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना देणार दहा हजार पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:13 PM2019-04-22T21:13:23+5:302019-04-22T21:13:43+5:30
आज शालेय विद्यार्थी, युवक यांचे हात इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्यस्त झाले आहेत. त्यातील ज्ञान मिळविण्यातच ते धन्यता मानत आहेत. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आवश्यक गरज म्हणून पुस्तकांचे वाचन व्हायलाच हवे, या उद्देशाने पुस्तक दोस्ती अभियानातून जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दहा हजार पुस्तकांचे वितरण करण्याचा संकल्प पुस्तक दोस्ती अभियानाचे प्रणेते सचिन सावरकर यांनी जाहीर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आज शालेय विद्यार्थी, युवक यांचे हात इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्यस्त झाले आहेत. त्यातील ज्ञान मिळविण्यातच ते धन्यता मानत आहेत. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आवश्यक गरज म्हणून पुस्तकांचे वाचन व्हायलाच हवे, या उद्देशाने पुस्तक दोस्ती अभियानातून जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दहा हजार पुस्तकांचे वितरण करण्याचा संकल्प पुस्तक दोस्ती अभियानाचे प्रणेते सचिन सावरकर यांनी जाहीर केला.
२३ एप्रिल या जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून माहिती देताना ते म्हणाले, दोन दशकांपासून विद्यार्थी वाचनापासून दूर गेलेला आहे. याची अनेक कारणे आहेत. नव्या पिढीच्या पालकांपासून तर शैक्षणिक धोरणापर्यंत ही लांबलचक यादी आहे. परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी आग्रही असणारी पालकांची पिढी आजच्या शिक्षणातून निर्माण झाली आहे. मुलांविषयी पालकांच्या चेहऱ्यावर कायम चिंतेचे जाळे पाहावयास मिळते. एक सजग पालक व शिक्षक म्हणून पुस्तक वाचनातूनच बुद्धीला चालना मिळू शकते. समाजाला समजावून घेणारी पिढी निर्माण करता येऊ शकते. त्यासाठीच ही पुस्तक दोस्ती चळवळ राबविली जात आहे. सर्वत्र चंगळवाद फोफावत असताना पुस्तक दोस्ती चळवळ विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारी ठरू शकते. समाजमनाला वैचारिक वळण लावण्याचे कामही या चळवळीच्या माध्यमातून होऊ शकेल, असा विश्वास सावरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
युनेस्कोने २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून घोषित केला आहे. १९९५ पासून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यात पुस्तक दोस्ती उपक्रम या दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेत असते. यंदाही पुस्तक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- सचिन सावरकर, प्रणेते, पुस्तक दोस्ती उपक्रम.