महावितरणच्या अभियंत्याला दहा हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:41 PM2018-07-18T22:41:41+5:302018-07-18T22:41:54+5:30
स्थानिक महावितरणच्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वाघोली येथील शेतकरी बाबुलाल नौकरकार यांचा कृषीपंपाचा विद्युत पुरवठ्याचे विद्युत खांब व तार तुटून ४८३ दिवस विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आल्या प्रकरणी नागपूरच्या विद्युत लोकपालांनी महावितरणच्या अभियंत्यांना दोषी ठरवून थेट दहा हजारांचा दंड ठोठावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : स्थानिक महावितरणच्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वाघोली येथील शेतकरी बाबुलाल नौकरकार यांचा कृषीपंपाचा विद्युत पुरवठ्याचे विद्युत खांब व तार तुटून ४८३ दिवस विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आल्या प्रकरणी नागपूरच्या विद्युत लोकपालांनी महावितरणच्या अभियंत्यांना दोषी ठरवून थेट दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून सदर रक्कम अर्जदाराला मानसिक त्रास, गैरसोय व लवादाचा खर्चाची भरपाई म्हणून ३० दिवसांच्या आत देण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
तालुक्यातील वाघोली येथील शेतकरी बाबुलाल नौकरकार यांच्या कृषीपंपाच्या विद्युत पुरवठ्याचे वीज खांब आणि तार १२ एप्रिल २०१६ ला तुटले. त्याची दुरूस्ती ७ जून २०१७ पर्यंत करण्यात आली नाही. खंडित झालेल्या विद्युत पुरवठ्यातील तांत्रिक दोष ४८ तासांच्या आत शोधून तो दूर करणे क्रमप्राप्त आहे. विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून सदर शेतकºयाने संबंधितांना वारंवार विनंती अर्ज केला. मात्र, त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले. त्यानंतर अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाल्याने याबाबत तक्रार निवारण कक्ष वर्धा यांच्याकडे दाद मागितली. यावर सुनावणी होवून ४८ तासात विद्युत पुरवठा सुरु करण्याचा आदेश झाला. परंतु, नुकसान भरपाईच्या मागणीला विलंब झाल्याचे कारणा पुढे करीत सदर मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने प्रकरण ग्राहक तक्रार निवारण मंच महावितरण नागपूर यांच्याकडे दाखल केले. मंचाने यावर सुनावणी घेऊन प्रकरण मुदत बाह्य असल्याचे दर्शवून प्रकरण खारीज केले. सदर मंचाचा आदेश मान्य नसल्याने अर्जदाराने विद्युत लोकपाल नागपूर यांच्याकडे प्रकरण दाखल केले. त्यावर विद्युत लोकपालांनी सुनावणी घेवून सदरचा निकाल दिला. अर्जदार शेतकºयांची बाजू भीमराव बेताल यांनी मांडली.