विस्कटलेली आर्थिक घडी सुधारणार ‘तेंदुपत्ता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:33 PM2019-03-23T22:33:48+5:302019-03-23T22:35:46+5:30
शेतीची कापणी ते मळणी व अन्य कामे आता यंत्राच्या माध्यमातूने होत असल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. अशा स्थितीत तेंदूपत्ता संकलनातून जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम आणि रोजगारही उपलब्ध झाला असून त्यांची विस्कटलेली आर्थिक घडी सुधारण्यास निश्चितच सहायक ठरणार आहे.
सुहास घनोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतीची कापणी ते मळणी व अन्य कामे आता यंत्राच्या माध्यमातूने होत असल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. अशा स्थितीत तेंदूपत्ता संकलनातून जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम आणि रोजगारही उपलब्ध झाला असून त्यांची विस्कटलेली आर्थिक घडी सुधारण्यास निश्चितच सहायक ठरणार आहे.
खरीप व रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर असल्याने गावांतील मजुरांची भिस्त आता तेंदूपत्त्यावर आहे. जंगलव्याप्त भागात मोठ्या प्रमाणावर तेंदूपत्त्याची झाडे आहेत. जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे २० युनिट आहे. यातील युनिटचा दोन टप्प्यात ई-लिलाव झाला असून ५ युनिट शिल्लक आहेत. या लिलाव प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाल्यानेच मजुरांच्या रोजगाराचीही समस्या निकाली निघाली आहे. जिल्ह्यातील २० युनिटवर प्रत्येकी १०० ते १५० याप्रमाणे ३ हजार मजूर कार्यरत आहे. वनविभागात त्यांनी नोंदणी झाली आहे. तेंदूपत्ता संकलनातून या मजुरांना हक्काचा हंगामी रोजगार, रोखीने मजुरी याशिवाय बोनसही मिळतो. एकंदरीत तेंदूपत्ता संकलनामुळे मजुरांच्या आयुष्यात प्रकाशपेरणीचेच काम होते. आष्टी वनक्षेत्रा अंतर्गत सत्तरपूर, माणिकवाडा ही दोन युनिट असून अपेक्षित उत्पन्न १,१०० स्टॅण्डर्ड बॅग, पारडी, तळेगाव या दोन युनिटअंतर्गत १,३०० स्टॅण्डर्ड बॅग, कारंजा वनक्षेत्राअंतर्गत कारंजा, गारपीट या युनिटस्मधून अपेक्षित सर्वाधिक उत्पन्न १,८०० स्टॅण्डर्ड बॅग तर जऊरवाडा, धानोली या दोन युनिटमधून ९०० स्टॅण्डर्ड बॅग, आर्वी क्षेत्राअंतर्गत आर्वी, वाढोणा, रोहणा हे तीन युनिट मिळून अपेक्षित उत्पन्न ८०० स्टॅण्डर्ड बॅग, एकट्या आजनगाव युनिट ५०० स्टॅण्डर्ड बॅग, खरांगणा क्षेत्रांतर्गत मासोद, खरांगणा युनिट ८०० बॅग, हिंगणी क्षेत्राअंतर्गत झडशी, केळझर युनिटमधून अपेक्षित उत्पन्न १००० बॅग, हिंगणी ३०० बॅग, समुद्रपूर क्षेत्रातील गिरड युनिट १२०० तर हिंगणघाट युनिटमधून ६०० असे एकूण २० युनिटमधून १० हजार ३०० स्टॅण्डर्ड बॅग तेंदूपत्ता संकलन अपेक्षित आहे.
पारंपरिक शेतीची कामे संपली आहेत. गावखेड्यात मजुरांच्या हातांना काम नसते. अशावेळी तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून मजुरांना रोजगार उपलब्ध झाला असून त्यांना मजुरीही तत्काळ रोखीने दिली जाते. मजुरांचे जीवनमान सुधारण्यास तेंदूपत्ता पूरक ठरत आहे.
- सुहास बढेकर, सहायक उपवनसंरक्षक, वर्धा.
आचारसंहितेत रखडला तिसरा लिलाव
तेंदूपत्ता युनिट वितरणाचे दोन टप्पे झाले आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायत आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असल्याने तेंदूपत्ता युनिट वाटपाचा तिसरा लिलाव रखडला आहे. यामध्ये सत्तरपूर, माणिकवाडा, पारडी, तळेगाव आणि केळझर या पाच युनिटचा लिलाव व्हावयाचा आहे.