सार्वजनिक रस्ता खणल्याने गावात तणाव
By admin | Published: May 12, 2014 12:06 AM2014-05-12T00:06:11+5:302014-05-12T00:06:11+5:30
तालुक्यातील खापरी (बर्फा) येथे शेताला लागून असलेला रस्ता शेतमालकाने जेसीबी यंत्राद्वारे खोडून काढला़ या प्रकारामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे़
समुद्रपूर : तालुक्यातील खापरी (बर्फा) येथे शेताला लागून असलेला रस्ता शेतमालकाने जेसीबी यंत्राद्वारे खोडून काढला़ या प्रकारामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे़ या प्रकरणी प्रशासनाने हस्तक्षेप करीत त्वरित योग्य कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़ याबाबत समुद्रपूर येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे़ खापरी (बर्फा) हे पुनर्वसन झालेले गाव आहे़ येथे ढाले यांच्या घरापासून सार्वजनिक विहिरीपर्यंत ग्रामपंचायतीच्या अधिकारातील २० फूट रुंदीचा खडीकरण झालेला रस्ता आहे़ हा रस्ता सुमारे २० वर्षांपासून अस्तित्वात आहे. या रस्त्याला लागून अरविंद तुकारामजी ढोके यांचे शेत आहे़ सदर रस्ता शेताच्या हद्दीत येत असल्याचे कारण पूढे करीत ढोके यांनी जेसीबी यंत्राद्वारे संपूर्ण रस्ताच खोदून काढला. यावेळी मौका चौकशीसाठी आलेल्या तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामसेवकांना न जुमानता सदर शेतमालकाने सार्वजनिक रस्त्यावर जेसीबी यंत्र चालविले. नेहमीचा रहदारीचा रस्ता बंद झाल्याने गावकर्यांची गैरसोय होत आहे. या प्रकरणात गावकरी व शेतमालक यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ सध्या गावात तणावाची परिस्थिती आहे. संबंधित अधिकार्यांनी गावाची पाहणी करीत वस्तुस्थिती तपासावी व रहदारीचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे़ यावेळी सचिन चाफले, भगवान झाडे, रमेश खोंडे, धनराज हेपट, चिंधूजी ढाले, कवडू शहारे, राजू सोनवणे, घनश्याम भोंगरे, झाडे, आडकीणे, क्षीरसागर, मेश्राम तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)