काँग्रेस नेत्यांच्या ताणाताणीत कार्यकर्त्यांमध्ये ताटातूट? आपापसातील कुरघोडींमुळे पक्षाची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 01:55 PM2022-03-22T13:55:56+5:302022-03-22T14:01:07+5:30

वर्धा जिल्ह्यात खासदारांसह भाजपचे तीन, तर काँग्रेसचा एक आमदार आहे. भाजपनंतर काँग्रेस हाच जिल्ह्यात मोठा पक्ष असून दोन गटांत विभागला गेला आहे.

tensions between Congress leaders and activists, party divides in two groups | काँग्रेस नेत्यांच्या ताणाताणीत कार्यकर्त्यांमध्ये ताटातूट? आपापसातील कुरघोडींमुळे पक्षाची वाट बिकट

काँग्रेस नेत्यांच्या ताणाताणीत कार्यकर्त्यांमध्ये ताटातूट? आपापसातील कुरघोडींमुळे पक्षाची वाट बिकट

Next
ठळक मुद्देऑनलाईन सदस्य नोंदणीतही जिल्हा माघारला

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा वर्धा जिल्हा एकेकाळी बालेकिल्ला होता; पण हा बालेकिल्ला गटबाजीमुळे पुरता खिळखिळा झाला आहे. स्थानिक नेत्यांच्या आपसी मतभेदामुळे कार्यकर्तेही कमालीचे अस्वस्थ असून अशीच परिस्थिती राहिली तर आगामी निवडणुकींच्या काळात कार्यकर्त्यांतही ताटातूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा आता काँग्रेसच्याच गोटातून होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील काँग्रेस काही वर्षांपासून दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. दोन्ही गटांत समेट घडवून आणण्यात काँग्रेसचे अनुभवी नेते पालकमंत्री सुनील केदार यशस्वी होतील, असा विश्वास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही होता. त्यांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान तसे प्रयत्नही केले; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. अखेर काँग्रेस उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही नेत्यांमधील हेवेदावे संपायचे नाव घेत नाही.

नुकताच कारंजा तालुक्यातील नारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून पालकमंत्री सुनील केदार यांची उपस्थिती होती. पालकमंत्री कार्यक्रमाच्या वेळेपूर्वीच कारंजा येथील विश्रामगृहामध्ये पोहोचले. विशेषत: येथील नगरपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही काँग्रेसचा एकही नेता किंवा पदाधिकारी विश्रामगृहात आला नाही.

याशिवाय ज्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होते त्या गावातही काँग्रेसची सत्ता आहे; परंतु पालकमंत्री उपस्थित असताना काँग्रेसचे सरपंच, माजी आमदार किंवा नगरपंचायतचे पदाधिकारी व काँग्रेसचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. अखेर पालकमंत्र्यांना भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हा उद्घाटन सोहळा पार पाडावा लागला. यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे ‘हम नही सुधरेंगे’ असेच धोरण असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

जिल्ह्यात राज्याचे तीन पदाधिकारी

जिल्ह्यात खासदारांसह भाजपचे तीन, तर काँग्रेसचा एक आमदार आहे. भाजपनंतर काँग्रेस हाच जिल्ह्यात मोठा पक्ष असून दोन गटांत विभागला गेला आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे दोन राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष असून एक सचिवही आहे. असे असतानाही आपापसातील कुरघोडीमुळे काँग्रेसची वाट फार बिकट होत आहे. काँग्रेसची विचारधारा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरिता ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या अभियानाच्या माध्यमातून ऑनलाईन सदस्य नोंदणी सुरू केली आहे. मात्र, याला अल्प प्रतिसाद असून राज्यात वर्धा जिल्हा शेवटून आठव्या स्थानी असल्याची माहिती आहे. या नोंदणीकरिता कार्यकर्ते झटत असताना नेत्यांचे सहकार्य नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: tensions between Congress leaders and activists, party divides in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.