दहाव्या दिवशी शिक्षकांचे उपोषण स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:58 PM2018-01-11T23:58:46+5:302018-01-11T23:58:57+5:30
जिल्ह्यातील ३० शिक्षकांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याबाबत १ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर २० शिक्षकांसह आंदोलन सुरू करण्यात आले होते. याबाबत शिक्षण विभागाचे अवर सचिव रोहटकर यांचे शिक्षणमंत्र्यांकडे १६ जानेवारीला सभा असल्याचे पत्र बुधवारी प्राप्त झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील ३० शिक्षकांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याबाबत १ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर २० शिक्षकांसह आंदोलन सुरू करण्यात आले होते. याबाबत शिक्षण विभागाचे अवर सचिव रोहटकर यांचे शिक्षणमंत्र्यांकडे १६ जानेवारीला सभा असल्याचे पत्र बुधवारी प्राप्त झाले. यावरून रात्री उपोषण स्थगित करण्यात आले.
शालार्थ प्रणालीत नावे समाविष्ट करण्याचे राज्यात १२०० पेक्षा अधिक प्रकरणे संचालक पुणे स्तरावर बºयाच महिन्यांपासून प्रलंबित आहेत. यात वर्धा जिल्ह्यातील ३० प्रकरणे प्रलंबित होती. मागील ४-५ वर्षंपासून वेतन नसलेल्या शिक्षकांनी कंटाळून १ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले. यात आंदोलन काळात आठ शिक्षकांची शालार्थ आयडीची प्रकरणे मान्य करून अन्य प्रकरणांत जाणीवपूर्वक त्रुटी काढल्याने आंदोलक संतापले. जोपर्यंत सर्वांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचे ठरले. शेवटी लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करून शिक्षणमंत्र्यांकडे चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यामुळे सातव्या दिवशी बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले. शिक्षक आ. नागो गाणार, शिक्षक परिषदेचे वेणू कडू, नरेंद्र वातकर यांनी मंत्र्यालयात पाठपुरावा करून शिक्षकमंत्र्याकडे १६ जानेवारी रोजी वर्धा जिल्ह्यातील शिक्षकांचे शालार्थ आयडीमध्ये नावे समाविष्ट करण्याबाबतच्या सभेचे पत्र प्राप्त झाले. यामुळे १ जानेवारीपासून सुरू केलेले आंदोलन दहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. आता शिक्षण मंत्र्यांच्या निर्णयाकडे आंदोलकांचे लक्ष लागले आहे. आंदोलनकर्त्यांना न्याय न मिळाल्यास अधिक उग्र आंदोलन करण्याचा इशारा अजय भोयर यांनी दिला आहे.
आंदोलनाला मागील दहा दिवसांपासून ५०० शिक्षकांनी भेटी दिल्या. आंदोलनाला मनोहर वाके, अनिल टोपले, मुकेश इंगोले, नरेंद्र थुटे, संजय बारी, सुनील गायकवाड, चंदू वाणी, रवी कोठेकर, पुंडलिक नाकतोडे, पुंडलिक राठोड, रहिम शहा, विद्याधर वानखेडे, राजू कारवटकर, रमेश टपाले, धिरज समर्थ, अशोक काळे, अमोल वाशिमकर, परमेश्वर केंद्रे, संजय चौधरी, राजेंद्र तिरभाने, उद्धव गाढे, गजानन साबळे, मनीष मारोटकर, अशोक काळे, धनराज कावटे आदींनी सहकार्य केले.