आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं ‘तेरवं’ ‘भारत रंग’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 07:41 PM2021-12-07T19:41:08+5:302021-12-07T19:41:49+5:30
Wardha News आत्महत्याग्रस्त शेतकरी एकल महिलांच्या कथा मांडणारे नाटक ‘तेरवं’ची निवड नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीच्या २२ व्या ‘भारत रंग महोत्सव’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी करण्यात आली आहे.
वर्धा: मर्द शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांच्या विधवा बायका मात्र जगण्याशी दोन हात करीत मर्दानी संघर्ष करतात, हे सारतत्त्व असलेले, आत्महत्याग्रस्त शेतकरी एकल महिलांच्या कथा मांडणारे नाटक ‘तेरवं’ची निवड नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीच्या २२ व्या ‘भारत रंग महोत्सव’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी करण्यात आली आहे.
श्याम पेठकर लिखित आणि हरीष इथापे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाची निर्मिती अध्ययन भारती, वर्ध्याच्या ॲग्रो थिएटरने केली आहे. या नाटकाला वीरेंद्र लाटणकर यांनी संगीत दिले आहे. कोरोनापूर्व काळात या नाटकाचे मुंबई विद्यापीठाच्या नाट्यमहोत्सवात, तसेच पुणे, औरंगाबाद, नागपूर व इतर काही ठिकाणी प्रयोग झाले आहेत. पण, नंतर या नाटकाचे प्रयोग बंद पडले. देश आणि विदेशांतील ७७१ नाटकांचा अभ्यास केल्यावर भारतातून विविध प्रांत व भाषांमधील ७७ नाटके निवडण्यात आली. तसेच विदेशी रंगभूमीवरील दहा नाटकांच्या निवडीसह ८७ नाटकांचा समावेश भारत रंग महोत्सवात आहे. देशी नाटकांपैकी ‘तेरवं’ सह चार मराठी नाटकांचा समावेश यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या नाटकात शेतकरी विधवा महिलांनीच काम केले आहे. महिलांचे नाट्य प्रशिक्षण घेऊन त्यातून तेरा महिलांची निवड करण्यात आली. समूह नाट्याच्या शैलीत बसविण्यात आलेल्या या नाटकाचे वैशिष्ट त्याचे संगीत हेच आहे. जात्यावरील ओव्यांच्या लयीत या नाटकाचे कथानक समोर सरकते. या समूहनाट्यात पुरुषांच्या भूमिकाही महिलांनीच वठवल्याने या नाटकाची सर्वच स्तरातून दखल घेतली जात आहे.
मराठी साहित्य संमेलनातही मिळाला मान
महाराष्ट्रातील शेतकरी परिवाराचे विदारक चित्र उभे करणाऱ्या ‘तेरवं’ या नाटकाच्या लेखनासाठी लेखक श्याम पेठकर यांना २०२० चा महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. सोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईने उत्कृष्ट लेखक म्हणून गौरव केला आहे. यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान या नाटकात काम करणारी शेतकरी विधवा वैशाली येडे हिला मिळाला होता. दिग्दर्शक हरीष इथापे यांचा मराठी नाटक समूह, मुंबईकडून प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून सन्मान करण्यात आला.