चाचण्या 3 हजारांच्या, पावती देतात मात्र 2,800 रुपयांची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 05:00 AM2021-05-12T05:00:00+5:302021-05-12T05:00:16+5:30

राज्य शासनाने आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. याकरिता रुग्ण शासकीय रुग्णालयात चाचणी करण्यासाठी गर्दी करीत आहे. येथे केवळ १० रुपयांच्या पावतीवर आरटीपीसीआर, अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात येत असून, एक -दोन दिवसांत रिपोर्टही दिला जातो.  शासकीय रुग्णालयात चाचणीकरिता उसळणारी गर्दी आणि कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका म्हणून अनेकांकडून खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये चाचणी करून घेण्यास प्राधान्य दिले जात आहे.

Tests for Rs 3,000, receipts for Rs 2,800 only! | चाचण्या 3 हजारांच्या, पावती देतात मात्र 2,800 रुपयांची!

चाचण्या 3 हजारांच्या, पावती देतात मात्र 2,800 रुपयांची!

Next
ठळक मुद्देपॅथलॅब संचालकांचे लूटमार धोरण : अनेकांना पावती देण्यासही नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना संसर्गाचा कठीण काळ असताना शहरातील पॅथॉलॉजी लॅब संचालकांनी लूटमारीचे अजबच धोरण अवलंबिले आहे. तीन हजार रुपयांच्या चाचण्या केल्यानंतर पावती मात्र २,८०० रुपयांची दिली जात आहे. तर अनेकांनी मागणी केल्यानंतर पावती देण्यास नकार दिला जात आहे.
राज्य शासनाने आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. याकरिता रुग्ण शासकीय रुग्णालयात चाचणी करण्यासाठी गर्दी करीत आहे. येथे केवळ १० रुपयांच्या पावतीवर आरटीपीसीआर, अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात येत असून, एक -दोन दिवसांत रिपोर्टही दिला जातो.  शासकीय रुग्णालयात चाचणीकरिता उसळणारी गर्दी आणि कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका म्हणून अनेकांकडून खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये चाचणी करून घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. वर्धा शहरात तीन ते चार नामांकित कंपन्यांच्या फ्रॅन्चाइजी असलेल्या पॅथलॅब आहेत. ज्यांना फ्रॅन्चाइजी देण्यात आली,  त्या संचालकांकडे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर नाही. लहानशा दुकान गाळ्यातूनच चाचणीचे काम केले जात आहे. या पॅथलॅब संचालकांकडून सर्वसामान्यांची अव्वाचे सवा शुल्क आकारणी करून सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. एक हजार रुपयांची चाचणी केल्यानंतर पावती मात्र, ८०० रुपयांचीच दिली जात आहे.  घरी येऊन चाचणी करणाऱ्यांकडूनही मनमानी शुल्क आकारले जात आहे. इमर्जन्सी चाचण्या करावयाची असल्यास आणि रिपोर्ट तत्काळ हवे असल्यास अतिरिक्त पैसे घेतले जात आहे. तर काही रुग्णांना पावती देण्यास लॅब संचालकांकडून नकार दिला जात आहे. संबंधित तीन-चारही पॅथलॅबच्या दरातही प्रचंड तफावत आहे. मात्र, या पॅथॉलॉजी लॅब संचालकांवर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे नियंत्रण नाही. नियंत्रणाची जबाबदारी  असलेले जिल्हा शल्य चिकित्सक मौन धारण करून आहे, तर जिल्हा आरोग्य अधिकारी यासंदर्भात भाष्य करण्यास टाळत आहेत. त्यामुळे लूटमारीचा हा बेकायदेशीर धंदा आणखीच तेजीत आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता न्यायालयातच धाव घेण्याचा मानस मंगळवारी ‘लोकमत’कडे बोलून दाखविला.

चाचण्यांचे दर ‘युनिफॉर्म’ असावेत
कोविड चाचणीसह विविध चाचण्या केल्या जाणाऱ्या पॅथलॅबच्या दरात प्रचंड तफावत आहे. मेडिसिस नामक पॅथलॅबमध्ये आरटीपीसीआरकरिता १२०० रुपये आकारले जात असून, थायरोकेअरकडून १००० ते १२०० आणि एनआरपीएल लॅबकडून ७८० रुपये आकारले जात आहेत. याशिवाय इमर्जन्सी, घरी येऊन चाचणी आदींचे दरही वेगवेगळे आहेत. शासनाने ठरवून दिलेले दर लॅब संचालकांकडून आकारले जात नसून, सर्वसामान्यांची अव्याहत लूट केली जात आहे.

पहिल्या लाटेत केली रग्गड कमाई
कोरोना संसर्गाने मागील वर्षापासून राज्यासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. या काळात अनेकांनी फ्रॅन्चाइजी असलेल्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली असता चक्क २२०० ते २५०० रुपये उकळण्यात आले. कोरोनाच्या या पहिल्या महामारीच्या लाटेत, लॅब संचालकांनी रग्गड कमाई केली. 

दिवसाकाठी ५ ते ६ हजार वसुली
पॅथॉलॉजी लॅबचालकांनी चाचण्या करण्याकरिता डीएमएलटी डिप्लोमाधारक, सोबतच सबएजंटची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णांच्या नातेवाइकाने संपर्क केल्यानंतर घरी चाचणी करण्यासाठी सबएजंट आणि डिप्लोमाधारकांनाच पाठविले जात आहे. चाचणीपोटी एक सबएजंट मनमानी शुल्क आकारत दिवसाकाठी ५ ते ६ हजार रुपयांची कमाई करीत आहे.

 

Web Title: Tests for Rs 3,000, receipts for Rs 2,800 only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.