पेपरफुटी घोटाळ्याच्या सूत्रधाराचे वर्धा कनेक्शन, अटकेमुळे देखमुखचा विवाह आला अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 02:23 PM2021-12-23T14:23:53+5:302021-12-23T14:35:41+5:30
गेल्या काही वर्षात प्रीतीश देखमुखचे राहणीमान अचानक बदलले. एका मध्यमवर्गीय तरुणाकडे एवढे वैभव कसे आले, याचे सर्वांनाच अप्रूप वाटायचे. आपण पुण्यात मोठे काम हाती घेतले आहे, अशी बतावणी तो आपल्या निकटवर्तीयांकडे करत असे.
वर्धा : आरोग्य विभागासह विविध परीक्षांच्या पेपरफुटी घोटाळ्यात अटक झालेला डॉ. प्रीतीश देशमुख हा वर्ध्याचा रहिवासी आहे. त्याच्याशी संबंधित विविध चर्चांना परिसरात उधाण आले आहे. दरम्यान, प्रतीशचा विवाहदेखील अडचणीत आला आहे.
डॉ. प्रीतीश दिलीप देशमुख याचे वर्धा शहरातील सेवाग्राम मार्गावरील स्नेहलनगर भागात घर आहे. त्याचे वडील वर्धा शहरालगतच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक होते. अत्यंत हुशार व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. ते अलीकडेच सेवानिवृत्त झाले होते. मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील असलेले हे देशमुख कुटुंब वर्ध्यात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले. प्रीतीशने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्याचे शालेय शिक्षण वर्धा शहरातच झाल्याचे सांगण्यात येते.
गेल्या काही वर्षात प्रीतीशचे राहणीमान अचानक बदलले. त्याच्या ऐशोरामाबाबत परिसरात मोठी चर्चा होती. अचानक एका मध्यमवर्गीय तरुणाकडे एवढे वैभव कसे आले, याचे सर्वांनाच अप्रूप वाटायचे. आपण पुण्यात मोठे काम हाती घेतले आहे, अशी बतावणी तो आपल्या निकटवर्तीयांकडे करत असे. त्याने घोटाळ्यातील जमवलेल्या मायेतून वर्धा परिसरात मोठी गुंतवणूक केल्याचीही चर्चा आहे.
कोरोनाकाळात कोविड केअर सेंटर उभारणीचे विविध जिल्ह्यांतील कामही त्याने मिळवून घेतले होते. वर्धा येथील कोविड केअर सेंटरच्या उभारणीतही त्याचा पुढाकार होता, अशी माहितीही आता पुढे येत आहे. गेल्या वर्षीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याचा वर्ध्याशी संपर्क कमी होत गेला. येथील घरी त्याच्या कुटुंबातील काही सदस्य वास्तव्यास आहेत.
विवाह आला अडचणीत
डॉ. प्रीतीश यांचा नागपूर येथील डॉक्टर कन्येशी येत्या २८ डिसेंबर रोजी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच्या निमंत्रणपत्रिकाही वर्ध्यात वाटण्यात आल्या. मात्र प्रीतीशच्या अटकेनंतर हा विवाहही अडचणीत आल्याची चर्चा आहे.
वर्धा जिल्ह्यातूनही माया गोळा केल्याची शक्यता
वर्ध्यात कुठल्याही राजकीय मंडळीशी प्रीतीशचे विशेष संबंध नसले तरी काही मंडळींनी पुलगाव व चांदूर (रेल्वे) भागातून नोकरीच्या निमित्ताने प्रीतीशकडे संपर्क साधला होता. त्यांच्याकडून त्याने माया जमवली असावी, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.