पेपरफूट प्रकरण : प्रीतीश देशमुखचे होते विधान परिषद लढण्याचे स्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 10:44 AM2021-12-24T10:44:24+5:302021-12-24T11:09:33+5:30
TET Exam Scam: पेपरफुटी प्रकरणातील डॉ. प्रीतीश देशमुखला राजकारणातही रस आहे. विधान परिषद लढविण्याचे त्याचे स्वप्न होते, यासाठी तो एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात चकरा मारत असल्याची चर्चा आहे.
वर्धा : आरोग्य विभागासह विविध परीक्षांच्या पेपरफुटी घोटाळ्यात मुख्य सूत्रधार असलेला डॉ. प्रीतीश देशमुख याने वर्ध्यातही मोठी माया गोळा केल्याची चर्चा आता पुढे येऊ लागली आहे. इतकेच नव्हे तर, तो नागपूर तसेच मुंबईतील एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात वर्ध्यातील अनेक नेत्यांना दिसला असून, विधान परिषद लढविण्याचे त्याचे स्वप्न होते, अशी खमंग चर्चा वर्धा शहरात होऊ लागली आहे.
डॉ. प्रीतीश दिलीप देशमुख याचे स्नेहलनगर परिसरात ‘राजवाडा’ नामक आलिशान निवासस्थान आहे. त्याने घरासमोरील एका लेआउटमध्ये तब्बल ८ हजार स्क्वेअर फूट जागा खरेदी केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात पोलीस विभागाकडे माहिती विचारली असता अद्याप कुठलेही चौकशीचे आदेश प्राप्त झाले नसल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांनी दिली.
आईचा बोलण्यास नकार
त्याच्या आईची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी निवासस्थानी संपर्क केला असता त्याच्या आईने बोलण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या बोलू शकत नसल्याचे सुरक्षारक्षकाने सांगितले.
दोन महिन्यांतून येत होता घरी
प्रीतीश हा दोन महिन्यातून वर्ध्यातील त्याच्या निवासस्थानी यायचा. आठ ते दहा दिवस राहून तो परत पुण्याला जायचा, अशी माहिती त्याच्या निवासस्थानालगतच्या नागरिकांनी दिली. त्याने अल्पावधीतच एवढी माया कशी जमविली, याबाबत नागरिकही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
पोलीस भरती परीक्षेत प्रीतीशला ठेवले बाहेर
राज्यातील विविध जिल्ह्यांत झालेल्या पोलीस भरतीचे पेपर हे डॉ. प्रीतीश देशमुख याच्या जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी कंपनीमार्फत झाले. मात्र, वर्धा जिल्ह्यातील मुख्यालयात झालेल्या पोलीस भरतीचे पेपर हे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांच्याच देखरेखीत झाले. प्रीतीशला भरती प्रक्रियेत हस्तक्षेप करू दिला नसून, बाहेरच ठेवण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांनी दिली.
पुणे पोलिसांनी वर्ध्यात चौकशी करण्याची गरज
डॉ. प्रीतीश देशमुख याचे वर्धा कनेक्शन असल्याने तसेच त्याचे निवासस्थान वर्ध्यात असल्याने वर्ध्यातही त्याने अल्पावधीतच करोडो रुपयांची माया जमविल्याची चर्चा आहे. पुणे पोलिसांनी वर्ध्यात येऊन चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.