वास्तूविशारद, अभियंता पर्यवेक्षकांची नोंदणीला पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:42 PM2018-04-09T23:42:17+5:302018-04-09T23:42:17+5:30
नगर परिषदेचे कार्यक्षेत्र वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी काम करू इच्छिणाऱ्या वास्तूविशारद, अभियंता व पर्यवेक्षकांना नगर रचनाकार कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे; पण जिल्ह्यातील बहुतांश लोकांनी ही नोंदणी न केल्याने बांधकाम परवानगी मिळविणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आतापर्यंत केवळ १२६ जणांनी नोंदणी केली असून एकाची नोंदणी रद्द तर दोघांची नोंदणी अपग्रेड करण्यात आली आहे.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नगर परिषदेचे कार्यक्षेत्र वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी काम करू इच्छिणाऱ्या वास्तूविशारद, अभियंता व पर्यवेक्षकांना नगर रचनाकार कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे; पण जिल्ह्यातील बहुतांश लोकांनी ही नोंदणी न केल्याने बांधकाम परवानगी मिळविणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आतापर्यंत केवळ १२६ जणांनी नोंदणी केली असून एकाची नोंदणी रद्द तर दोघांची नोंदणी अपग्रेड करण्यात आली आहे.
नगर रचनाकार विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, शहरानजीकच्या अकरा ग्रा.पं. च्या बांधकाम परवानगीचा अधिकार नगर रचनाकार विभागाकडे आल्यानंतर फेब्रुवारी २०१६ पासून या कार्यालयात वास्तूविशारद, अभियंता आणि पर्यवेक्षकांची नोंदणी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या कार्यालयात नोंदणी करणाऱ्या व्यक्ती न.प. कार्यक्षेत्र वगळता संपूर्ण जिल्ह्यात बांधकाम परवानगीसाठी लागणारा नकाशा तयार करण्यासाठी तथा इतर कामांसाठी वैध मानले जातात; पण आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ ४० वास्तूविशारद (आर्कीटेक्ट), ५५ अभियंते (इंजिनिअर) आणि २८ पर्यवेक्षक (सुपर वायझर) यांनी नगर रचनाकार विभागाकडे नोंदणी करून घेतलेली आहे. ज्या वास्तूविशारद, अभियंता आणि पर्यवेक्षकांनी या कार्यालयात नोंदणी करून घेतलेली नाही, अशांकडून बांधकाम परवानगीसाठी नागरिकांनी नकाशा तयार करून घेतल्यास नोंदणी नसल्याने नकाशा मंजूर करून घेण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवाय नागरिकांना मानसिक व आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. नोंदणी नसलेल्या अनधिकृत व्यक्तींकडून तयार करून घेतलेले नकाशे व बांधकामाबाबत अन्य तांत्रिक बाबी मंजूर करायच्या की नाही, हा अधिकारही नगर रचनाकार कार्यालयाकडे आहे. परिणामी, माहिती नसलेल्या सामान्य नागरिकांची गोची होत असल्याचेच दिसून येत आहे. यामुळे संबंधितांनीही फसवणूक टाळणे गरजेचे आहे.
नगरपरिषदेची नोंदणी असल्यास पालिकेत वैध
जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, देवळी, आर्वी व सिंदी रेल्वे अशा सहा नगर पालिका आहेत. ज्या वास्तूविशारद, अभियंता व पर्यवेक्षकांनी पालिकेत नोंदणी केली ते न.प. क्षेत्रात काम करण्यासाठी वैध मानले जातात; पण त्यानी नगर रचनाकार कार्यालयात नोंदणी न केल्यास ते न.प. क्षेत्र वगळता इतर ठिकाणी काम करण्यास पात्र नसल्याचे नगर रचनाकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रथम नोंदणी वर्षभराची
वास्तूविशारद, अभियंता व पर्यवेक्षक यांना नोंदणी करण्यासाठी अर्ज व शपथपत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड आदी कागदपत्रे नगर रचनाकार कार्यालयात सादर करणे क्रमप्राप्त आहे. पहिली नोंदणी सदर कार्यालय उमेदवारांना वर्षभरासाठी देत असून त्यानंतर अधिकाधिक तीन वर्षांची मुदत असलेले नोंदणी प्रमाणपत्र नगर रचनाकार कार्यालयाकडून नोंदणी करणाऱ्यांना दिले जाते.
नोंदणीपासून अनभिज्ञ
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वास्तूविशारद, अभियंता व पर्यवेक्षक आहेत; पण अनेकांना नगर रचनाकार कार्यालयात नोंदणी करावी लागत असल्याची माहितीच नसल्याचे नोंदणी झालेल्या आकडेवारीवरून दिसून येते.
बोगसचा शोध नाहीच
जिल्ह्यात बऱ्यापैकी वास्तूविशारद, अभियंता व पर्यवेक्षक आहे; पण यापैकी अनेकांनी नगर रचनाकार कार्यालयात नोंदणी केलेली नसल्याचे दिसते. इतकेच नव्हे तर जिल्ह्यात बोगस वास्तूविशारद, अभियंता व पर्यवेक्षकही कार्यरत असल्याचे बोलले जाते. त्यांचा शोध अद्याप तरी नगर रचनाकार कार्यालय वा संबंधित विभागाने घेतला नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशावरून नोंदणी सुरू आहे. बोगस वास्तूविशारद, अभियंता व पर्यवेक्षकांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत मोहीम राबविलेली नाही. शिवाय तत्सम अधिकारही आम्हाला नाहीत.
- सु.व. देशमुख, नगर रचनाकार, वर्धा.