वर्धेकरांची सार्वजनिक गणेशोत्सवाकडे पाठ
By Admin | Published: September 4, 2016 12:25 AM2016-09-04T00:25:28+5:302016-09-04T00:25:28+5:30
साऱ्यांचे लाडके दैवत गणपती बाप्पाचे आगमण अवघ्या दोन दिवसांवर आले आहे. सार्वजनिक स्वरूपात साजरा होणारा उत्सव म्हणून इतिहासात नोंद
बाप्पाच्या आगमनाकरिता सज्ज : घरगुतींसह ‘एक गाव एक गणपती’त वाढ
रूपेश खैरी वर्धा
साऱ्यांचे लाडके दैवत गणपती बाप्पाचे आगमण अवघ्या दोन दिवसांवर आले आहे. सार्वजनिक स्वरूपात साजरा होणारा उत्सव म्हणून इतिहासात नोंद असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाकडे वर्धेकर पाठ करीत असल्याचे कमी होत असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येवरून दिसून येते. जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ६६ सार्वजनिक गणेश मंडळ कमी झाले आहेत.
प्रत्येकाच्या घरीच नव्हे तर मनात दहा दिवस मुक्काम असलेल्या बाप्पाच्या आगमणानिमित्त वर्धा नगरी सजली आहे. सर्वत्र जोरदार तयारी सुरू असताना एकोपा निर्माण करण्याकरिता असलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाकडे होत असलेली पाठ चिंतेचा विषय ठरत आहे. सन २०१५ मध्ये जिल्ह्यात सार्वजिनक गणेश मंडळाची संख्या २७० होती. त्यात घट होऊन ती २०४ वर आली आहे. एका वर्षात तब्बल ६६ सार्वजनिक मंडळ कमी झाले आहे. या तुलनेत आपल्या घरी दहा दिवस बाप्पाचा मुक्काम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सन २०१५ मध्ये जिल्ह्यात ११ हजार ६०१ घरी बाप्पा बसत असल्याची नोंद झाली आहे. यंदा यात वाढ झाली असून हा आकडा ११ हजार ८०५ एवढा आहे.
हा आकडा शासकीय असला तरी तो चुकीचा ठरण्याची शक्यता अधिक आहे. जिल्ह्यात केवळ ११ हजार घरी बाप्पाचे होणारे आगमण अत्यल्प आहे. जिल्ह्यात घरोघरी होत असलेल्या बाप्पाच्या पूजेमुळे हा आकडा वाढण्याची शक्यता नाही तर ती वाढ नक्कीच आहे. प्रशासनाच्यावतीने नदीवर होत असलेल्या विसर्जनाच्या नोंदीवरून ही माहिती काढल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक घरी विहिरीत होत असलेल्या विसर्जनामुळे हा आकडा अंदाजे असल्याचे दिसून आले आहे.
बाजारही सजला
बाप्पाचे आगमण आपल्या घरी होणार असल्याने त्यांच्या स्वागताकरिता व सजावटीत कुठलीही कमी राहू नये याकरिता प्रत्येक जण प्रयत्नरत असल्याचे दिसून आले. त्यांच्या याच आवडीची दखल घेत बाजारातही बऱ्याच सजावटीच्या वस्तू विक्रीकरिता आल्या आहेत. बाजार पुरता सजला असून रोषणाईचे साहित्य, सजावटीकरिता प्लास्टिकच्या फुलांसह थर्माकोलचे मंदिर, विविधरंगी कपडे बाजारात विक्रीकरिता आले आहेत.
मूर्तींची दुकाने सजली
वर्धेतील साईमंदिर परिसरात बाप्पाच्या मूर्तींची दुकाने सजली आहेत. यात ग्राहक आपल्या आवडीने मूर्तीची निवड करीत असल्याचे दिसून आले आहे. काहींनी आठ दिवसांपूर्वीच मूर्ती बूक करून ठेवल्याचे दिसून आले आहे. ज्यांना त्यांच्या पसंतीची मूर्ती मिळाली नाही त्यांच्याकडून या भागात असलेल्या दुकानात फिरून आवडीची मूर्ती शोधण्याचे काम सुरू आहे.