कारला परिसरात होता बनावट नोटांचा छापखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 10:23 PM2019-04-09T22:23:21+5:302019-04-09T22:24:08+5:30
समुद्रपुरच्या बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणणाऱ्या राजू भाष्कर इंगोले याला पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता कारला परिसरात दोन खोल्या भाड्याने घेऊन तेथेच बनावट नोटा छापत असल्याचे उघडकीस आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समुद्रपुरच्या बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणणाऱ्या राजू भाष्कर इंगोले याला पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता कारला परिसरात दोन खोल्या भाड्याने घेऊन तेथेच बनावट नोटा छापत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तेथून पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटांसह साहित्य जप्त केले.
समुद्रपूर येथील नवनीत गंगशेट्टीवार हे ५ एप्रिल रोजी त्यांच्या किराणा दुकानात असताना आरोपी राजू इंगोले रा. उमरी रोड, मराठा हॉटेल समोर वर्धा, याने दुकानात जाऊन हळद घेण्याच्या बहाण्याने दुकानदारास बनावट नोट देऊन फ सवणूक केली होती. तसेच इतरही दोन दुकानदारांचीही फसगत केल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी राजू इंगोले याला अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एकाच क्रमांकाच्या बनावट नोटा मिळून आल्या. सखोल तपास करण्याकरिता पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. याकरिता विशेष पथक नियुक्त करुन या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी राजू इंगोले कडून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरल्या जाणारे ३२ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, आशीष मोरखडे, नामदेव किटे, प्रदीप देशमुख, संजय ठोंबरे, नरेंद्र डहाके, हरीदास काकड, वैभव कट्टोजवार, सचिन खैरकार, अमिल शुक्ला, कुलदीप टांकसाळे, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, आत्माराम भोयर व भूषण पुरी यांनी केली.
बाजाराच्या दिवशी करायचा नोटांचा वापर
जिल्ह्यातील गावांमध्ये कोणत्या दिवशी बाजार भरतो याची माहिती घेऊन आरोपी राजू इंगोले हा बाजाराच्या दिवशी बनावट नोट चलनात आणत होता. त्यामुळे पोलिसांनी राजू इंगोले याच्या राहण्याच्या व काम करण्याच्या ठिकाणाचा शोध घेतला. तेव्हा त्याने कारला येथील कोहाड लॉनजवळील दोन खोल्या कृषी केंद्राचे साहित्य घेण्याकरिता भाड्याने घेतल्या होत्या. या खोल्यांची तपासणी केली असता येथून एक इपसॉन कंपनीचे इंकजेट प्रींटर, ५०० रुपयाच्या दोन नोटा, दोन बनावट नोटा तसेच त्या नोटांच्या ३२ झेरॉक्स, एक बिल्ट रॉयल एक्झिक्युटिव्ह बॉन्ड पेपर रीम, निळया, लाल, पिवळया व काळया रंगाच्या इपसॉन कपंनीच्या बॉटल्स, कैची, फेव्हीकॉल बॉटल, खोडरबर, पांढऱ्या रंगाचे धागा बंडल, पेन्सिल आदी साहित्य जप्त करण्यात आले.