वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षपदी ठाकरे बिनविरोध, उपाध्यक्षपदी चक्रधर गोटेंची निवड, महाविकास आघाडीची पुन्हा सरशी
By सुनील काकडे | Published: October 14, 2022 05:10 PM2022-10-14T17:10:02+5:302022-10-14T17:11:23+5:30
Washim Zilla Parishad: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत दोन्ही पदांकरिता अनुक्रमे तत्कालिन अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आणि माजी सभापती चक्रधर गोटे या दोघांचेच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली
- सुनील काकडे
वाशिम - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत दोन्ही पदांकरिता अनुक्रमे तत्कालिन अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आणि माजी सभापती चक्रधर गोटे या दोघांचेच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यायोगे जिल्हा परिषदेत पुन्हा एकवेळ महाविकास आघाडीची सरशी झाली आहे.
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेची गतवेळची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२० मध्ये झाली होती. अडीच वर्षांचा कालावधी संपल्याने ग्रामविकास विभागाकडून उर्वरित अडीच वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण ३० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले. त्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव निघाले होते.
दरम्यान, जिल्हा परिषदेत रा.कॉं., कॉंग्रेस, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे; तर भाजप व जिल्हा जनविकास आघाडी विरोधी बाकांवर आहेत.
जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज, १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांमध्ये एकमत झाले. अडीच वर्षांपूर्वीचाच फाॅर्म्युला यावेळीही कायम ठेवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने कुणाचाही विरोध शिल्लक न राहिल्याने दोन्ही पदांची निवडणुक बिनविरोध पार पडली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या गळ्यात पुन्हा अध्यक्षपदाची माळ पडली; तर उपाध्यक्षपदी काॅंग्रेसचे चक्रधर गोटे यांची वर्णी लागली.