शहरात डोळ्यांच्या साथीने घातले थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:00 AM2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:15+5:30
डोळ्यांतील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो. त्याला ‘कॉन्जुक्टिव्ह’ म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊ डोळे चोळावेसे वाटतात. त्यालाच ‘डोळे आले’ असे म्हणतात. मागील आठवडाभरापासून शहरात या आजाराने थैमान घातल्याने खासगी आणि शासकीय रुग्णांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील आठवडाभरापासून शहरात डोळ्यांच्या साथीने थैमान घातले आहे. परिणामी, शासकीय आणि खासगी रुग्णालयात संसर्गजन्य या आजाराच्या रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे.
अनेक भागात या आजाराने थैमान घातले आहे. शहरातील विविध भागात असलेल्या अस्वच्छतेमुळे आणि बदलत्या वातावरणामुळे या आजाराने हातपाय पसरल्याचे बोलले जात आहे. डोळ्यांचा आजार हा संसर्गजन्य असल्यामुळे आरोग्य विभागापुढेही आव्हान उभे ठाकले आहे. डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, चिपड येणे, डोळ्यांना खाज सुटणे, सकाळी उठल्यावर डोळे उघडता न येणे, पाणण्यांवर सूज येणे, अंधूक दिसणे आदी विविध प्रकारची लक्षणे डोळ्यांचा आजार झालेल्या रुग्णांत दिसून येतात. ‘अॅडिनोव्हायरस’ हे विषाणू अस्वच्छतेमुळे वाढल्याने हा आजार पसरत आहे. खोकला आणि स्पर्श अशा विविध कारणांनी हा आजार पसरत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
डोळ्यांतील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो. त्याला ‘कॉन्जुक्टिव्ह’ म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊ डोळे चोळावेसे वाटतात. त्यालाच ‘डोळे आले’ असे म्हणतात. मागील आठवडाभरापासून शहरात या आजाराने थैमान घातल्याने खासगी आणि शासकीय रुग्णांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होत आहे.
डोळे आल्यास काळ्या चष्म्याचा उपयोग करावा, दिवसातून किमान चार-पाचवेळा स्वच्छ पाण्याचे डोळे धुवावे, डोळ्यात ड्रॉप्स, मलम (आॅइनमेंट) वापरताना हात स्वच्छ धुवावे. डोळ्यांकरिता वापरलेले रूमाल गरम पाण्यात स्वच्छ धुवावे त्याचप्रमाणे डोळे आलेल्या व्यक्तीचे कुठलेही साहित्य वापरू नये.गर्दीच्या ठिकाणी डोळे आलेल्या व्यक्तीने जाऊ नये. रुग्णाने डोळे पूर्ण बरे होईस्तोवर कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर टाळावा, जीवनसत्त्वयुक्त आहार घ्यावा, औषधोपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पावसाळ्यापासून आतापावेतो दररोज चार-पाच रुग्ण उपचाराकरिता येत आहेत. या आजाराचा बुब्बुळावर पर्यायाने दृष्टीवरदेखील परिणाम होताना दिसून येत आहे. डोळ्यांचा आजार संसर्गजन्य असून संपर्कातून याचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होतो. कुटुंबात एखाद्याला याची लागण झाल्यास इतरांनी त्याचे साहित्य वापवरणे टाळावे. दिवसातून तीन-चारवेळा डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे.वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. प्रदीप सुने, नेत्रतज्ज्ञ, वर्धा