‘ब्लॅकमेल’ करीत ठाणेदाराने केले तरुणीचे लैंगिक शोषण; पोलिस दलात खळबळ
By चैतन्य जोशी | Published: March 9, 2023 03:13 PM2023-03-09T15:13:30+5:302023-03-09T15:14:46+5:30
हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल
वर्धा : नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी पोलिस सदैव तत्पर असतात. मात्र, जेव्हा पोलिस अधिकारीच हैवान होतो तेव्हा दाद मागवी तरी कुणाकडे असा प्रश्न पडतो. अशीच एक धक्कादायक घटना हिंगणघाट शहरात पुढे आली. तक्रार देण्यास गेलेल्या २४ वर्षीय पीडितेची तक्रार न घेता तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करुन वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. ६ रोजीयाप्रकरणी हिंगणघाट पोलिसात पोलिस निरीक्षक संपत चव्हाण याच्याविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पीडिता तिच्या वडिलांविरोधात ५ ऑगस्ट २०२१ रोजी हिंगणघाट पोलिसात तक्रार देण्यास गेली असता कर्तव्यावर असलेले पोलिस निरीक्षक संपत चव्हाण याने तुझी मदत करतो, पण तु माझ्याशी मैत्री कर, असे म्हटले. पीडितेने नकार दिला असता चव्हाण याने तुझी तक्रार मी घेणार नाही असे सांगितले. पीडितेने मी वरिष्ठांकडे तक्रार करेल, असे म्हणत पोलिस ठाण्यातून निघाली. मात्र, १९ ऑगस्ट २०२१ रोजी संपत चव्हाण रात्री ९ वाजता पीडितेच्या घरी गेले आणि धमकी दिते एफआयर नोंदवितो असे सांगितले.
बरेच दिवस उलटल्यानंतरही तक्रार न घेतल्याने पीडितेने पुन्हा चव्हाण याला तक्रार घेण्यासाठी सांगितले. मात्र, चव्हाण याने पीडितेला चक्क एफआयर कराची असेल तर माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित कर, असे म्हणत बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ठाणेदार चव्हाण याने ब्लॅकमेल करीत वारंवार एप्रिल २०२२ पर्यंत पीडितेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपी पीडितेने तक्रारीत केला आहे. अखेर पोलिस निरीक्षक संपत चव्हाण याच्याविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरुन अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहेत.
तक्रार न घेण्यासाठी घेतले ३५ हजार रुपये
पीडिताच्या वडिलांनी मार्च २०२२ मध्ये पीडितेला संपत चव्हाण यांना ३५ हजार रुपयांचा धनादेश दिल्याचे सागून त्याचे फोटोही दाखविले. विशेष म्हणजे तो धनादेश हिंगणघाट येथील बँकेत संपत चव्हाण याच्या पत्नीच्या खात्यात जमा केला असून तुझी तक्रार ते घेणार नाही, असेही सांगितले होते. आरोपींना संपूर्ण माहिती पोलिस निरीक्षक संपत चव्हाण पुरवित असल्याचा आरोप तक्रारीत पीडितेने केला आहे.