पशुसंवर्धन आयुक्तांनी बाधित गावे सोडून लम्पीमुक्त गावांना दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 10:17 PM2022-11-10T22:17:17+5:302022-11-10T22:17:46+5:30
राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिनंद्र प्रताप सिंग आष्टीला येणार म्हणून अनेक गावचे सरपंच व लम्पी बाधित जनावरांचे पशुपालक आपल्या समस्या सांगण्यासाठी उत्सुक होते. परंतु तालुका पशुसंवर्धन विभागाच्या नियोजनामुळे आयुक्त दुपारी कधी आले आणि कधी निघून गेले, याचा थांगपत्ताही लागू दिला नाही. वडाळा गावातून लम्पीचा फैलाव झाला होता. एकट्या लहानआर्वी गावात ७८ जनावरांना बाधा झाली असून सात जनावरे आधीच दगावली होती.
अमोल सोटे
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : तालुक्यामध्ये लम्पी आजाराने चांगलाच कहर केेला असून दिवसागणिक बाधितांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. पशुसंवर्धन विभागातील दुर्लक्षितपणामुळे तालुक्यात आजार पाय पसरत असल्याची माहिती राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांना मिळाली. त्यामुळे त्यांनी आष्टी तालुक्यातील गावांना भेटी देण्याचा निर्णय घेत आष्टी गाठली. मात्र, त्यांनी बाधित गावांना भेट देऊन वास्तव बघण्याऐवजी लम्पीमुक्त गावांना भेटी दिल्याने रोष व्यक्त होत आहे. तालुका पशुसंवर्धन विभागानेच आयुक्तांची दिशाभूल करून या गावांकडे नेल्याची ओरड आता पशुपालकांकडून व्हायला लागली आहे.
राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिनंद्र प्रताप सिंग आष्टीला येणार म्हणून अनेक गावचे सरपंच व लम्पी बाधित जनावरांचे पशुपालक आपल्या समस्या सांगण्यासाठी उत्सुक होते. परंतु तालुका पशुसंवर्धन विभागाच्या नियोजनामुळे आयुक्त दुपारी कधी आले आणि कधी निघून गेले, याचा थांगपत्ताही लागू दिला नाही. वडाळा गावातून लम्पीचा फैलाव झाला होता. एकट्या लहानआर्वी गावात ७८ जनावरांना बाधा झाली असून सात जनावरे आधीच दगावली होती. आता आणखी चार जनावरे दगावली. पण, आयुक्तांच्या या दौऱ्यातून ही महत्त्वाची दोन्ही गावे वगळण्यात आली. यासोबतच इतरही गावांना त्यांनी भेटी दिल्या नाहीत. दुपारी दोन वाजता आयुक्त आष्टीला आले. त्यावेळी त्यांना आष्टी या तालुकास्थळी ज्यांची जनावरे लम्पीमुक्त झाली, अशा दोन ते तीन पशुपालकांच्या घरी नेण्यात आले. या पशुपालकांना आधीच आलेल्या अधिकाऱ्यांना काय सांगावे, हे पटवून देण्यात आले होते, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.
पशुपालकांनी केली पोपटपंची
- यावेळी आयुक्तांनी पशुपालकांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी सांगितल्याप्रमाणे पशुसंवर्धन विभागाचे गुणगान गायिले. लसीकरणासाठी पैसे घेतले का, औषधोपचार बाहेरून केला का, शासनाच्या व्यतिरिक्त तुम्हाला आर्थिक भुर्दंड बसला का, असे प्रश्न विचारले असता त्यांनी नाहीचा पाढा वाचत पोपटपंची केली. हे उत्तर ऐकल्यावर आयुक्तही समाधानी झाले. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, तालुका पशुसंवर्धन अधिकारी या तिघांनी राज्याच्या आयुक्तांना आष्टी तालुक्यातील सर्व परिस्थिती व्यवस्थित असल्याचा मौखिक संदेश देवून पशुपालकांची निराशा केली.
पशुसंवर्धन विभाग हायटेक मॅनेज?
- लहानआर्वी, वडाळा, बांबर्डा, बोरखेडी, थार, चांगला, तळेगाव, साहूर माणिकवाडा, तारासावंगा या गावांसह इतरही गावातील पशुपालक आयुक्तांची वाट पाहत बसले होते. मात्र, तालुका पशुसंवर्धन विभागाने त्यांची निराशाच केली. लम्पी जनावरांना लसीकरण करण्यासाठी दीडशे रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत पशुपालकाकडून वसुली केल्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याची चौकशी न करणे म्हणजे पशुसंवर्धन विभाग किती हायटेक पद्धतीने मॅनेज झाला आहे. याचा प्रत्यय काल पशुपालकांना अनुभवायला मिळाला. याप्रकरणी काही शेतकरी न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
अधिकाऱ्यांचा नो रिस्पाॅन्स
- पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाच्या तालुका व जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. पण, कोणीही प्रतिसाद दिला नसल्याने त्यांची बाजू समजून घेता आली नाही. अधिकारी इतके बेजबाबदारपणे वागत असल्यामुळे त्यांच्या लेखी तालुक्यातील लम्पी आजार मुक्त झाल्याचे दिसून येत आहे.
बांबर्डा, बोरखेडी गावांमधील जनावरांचे लसीकरण केले नाही. मात्र, लसीकरण केल्याचा खोटा अहवाल शासनाला सादर केला. काल पशुसंवर्धन आयुक्त आमच्या गावाला भेट देतील अशी अपेक्षा होती. दिवसभर वाट पाहिली. मात्र, आयुक्त आले नाहीत. यासाठी तालुका पशुसंवर्धन अधिकारी व जिल्हा पातळीवरील अधिकारी सर्वस्वी दोषी आहेत. कामचुकार अधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणे हा प्रकार गंभीर आहे.
लता गणेश कडताई, सरपंच, ग्रामपंचायत बांबर्डा.