दुचाकीने घेतला पेट अन् राहिला फक्त ‘सांगाडा’, पाहण्यासाठी नागरिकांची उसळली गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 15:47 IST2023-03-13T15:44:31+5:302023-03-13T15:47:08+5:30
बॅचलर रोडवरील घटना

दुचाकीने घेतला पेट अन् राहिला फक्त ‘सांगाडा’, पाहण्यासाठी नागरिकांची उसळली गर्दी
वर्धा : दुचाकी दुरुस्त करीत असतानाच अचानक पेट्रोलचा भडका उडून दुचाकीने पेट घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. पाहता पाहता दुचाकी जळून कोळसा होत फक्त सांगाडाच उरला. ही घटना ११ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बॅचलर रोडवर असलेल्या काँग्रेस कमिटीच्या सद्भावना भवनच्या लगत घडली. या घटनेमुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांची चांगलीच गर्दी उसळली होती.
मंजू जालन रा. बोरगाव (मेघे) यांची दुचाकी अचानक खराब झाल्याने ती दुचाकी घेऊन त्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बॅचलर रोडवरील सद्भावना भवनाच्या खाली असलेल्या सुरेश गाडी रिपेअरिंग सेंटरमध्ये घेऊन गेल्या. दुचाकी दुरुस्ती करीत असताना पेट्राेल लीक होत होते. दरम्यान अचानक करंट चेक करीत असताना दुचाकीने पेट घेतला आणि काही लक्षात येण्यापूर्वीच दुचाकीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. जवळपास एक तास ही आग सुरू होती. त्यानंतर दुचाकीचा फक्त सांगाडाच उरला होता.
नागरिकांनी केले मोबाइलमध्ये चित्रण...
दुचाकीने अचानक पेट घेतल्याने लगतच्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली होती. आग विझविण्याऐवजी नागरिकांनी भररस्त्यावर थांबून आपल्या मोबाइलमध्ये दुचाकीला लागलेल्या आगीचे चित्रण केले. रात्री विविध समाजमाध्यमांवर दुचाकीने पेट घेतलेल्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.