सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर चाकू लावत ‘शोरूम’मधून पळविली कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 10:09 PM2023-06-12T22:09:44+5:302023-06-12T22:10:04+5:30

Wardha News अज्ञात तीन लुटारूंनी शहरालगत असलेल्या ह्युंदाई कंपनीच्या शोरूममध्ये प्रवेश करीत सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर चाकू लावून नवी कोरी कार चोरून नेण्याचा प्रयत्न केला. पण, कार सुरू न झाल्याने लुटारूंनी सेकंड हॅण्ड कार घेऊन पोबारा केला.

The car was driven away from the 'showroom' by putting a knife on the neck of the security guard | सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर चाकू लावत ‘शोरूम’मधून पळविली कार

सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर चाकू लावत ‘शोरूम’मधून पळविली कार

googlenewsNext

वर्धा : अज्ञात तीन लुटारूंनी शहरालगत असलेल्या ह्युंदाई कंपनीच्या शोरूममध्ये प्रवेश करीत सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर चाकू लावून नवी कोरी कार चोरून नेण्याचा प्रयत्न केला. पण, कार सुरू न झाल्याने लुटारूंनी सेकंड हॅण्ड कार घेऊन पोबारा केला. ही घटना ११ जून रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, शहरालगतहून गेलेल्या दत्तपूर ते सावंगी वळण रस्त्यावर ह्युंदाई कंपनीचे शोरूम आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षक झोपलेला असताना तीन लुटारूंनी शोरूममागील सुरक्षा भिंत ओलांडून शोरूममध्ये प्रवेश केला. सुरक्षा रक्षकाला मारहाण करत त्याला चाकूचा धाक दाखवून कारच्या चाव्या मागितल्या. शोरूमचे शेटर उघडायला लावत ड्राव्हरमधील रोख रक्कम व कारच्या चाव्यांचा गुच्छा हिसकावला. नव्या कारचे दार उघडू न शकल्याने सेकंड हॅण्ड कार सुरू करण्याचा प्रयत्न केला. कार सुरू झाल्याने लुटारूंनी कार आणि रोख रक्कम घेऊन तेथून पळ काढला. याबाबतची माहिती सुरक्षा रक्षकाने सेवाग्राम पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ शोरूम गाठून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखा आणि सेवाग्राम पोलिसांकडून समांतर तपास सुरू आहे.

२१ मिनिटांचा थरार...

सुरक्षा रक्षक शोरूममध्ये झोपलेला असताना लुटारू मध्यरात्री १:२६ मिनिटांनी दाखल झाले. तिघांनी सुरक्षा रक्षकाला धमकावून कारच्या चाव्या मागितल्या. बाहेर उभ्या एका सेकंड हॅण्ड कारची चावी लागल्याने लुटारू कारमध्ये बसून १.४७ मिनिटाला शोरूमच्या बाहेर पडले. तब्बल २१ मिनिटे हा थरार सुरू होता.

तीन महिन्यांपूर्वीही झाला होता चोरीचा प्रयत्न

याच ह्युंदाई शोरूममध्ये तीन महिन्यांपूर्वीदेखील चोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र, काहीही चोरी न गेल्याने तक्रार करण्यात आलेली नव्हती. या घटनेनंतर शोरूममधील सुरक्षा यंत्रणा वाढविण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे करण्यात आले नाही याचाच फायदा चोरांनी उचलला.

शोरूम वाचली अन् सेकंड हॅण्ड पळविली

लुटारूंनी चाकूचा धाक दाखवत सुरक्षा रक्षकाकडून कारच्या चाव्यांचा गुच्छा घेतला. एक एक कार सुरू करून ते पाहत होते. मात्र, शोरूममधील नवी कार सुरू होत नसल्याने त्यांनी बाहेर परिसरात उभी असलेली २ लाख ६० हजार रुपये किमतीची कार (क्र. एमएच ४९ बी ८२००) चोरून पोबारा नेला.

७ हजारांची रक्कमही नेली चोरून

लुटारूंनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्यानंतर शोरूममधील ड्राव्हरची पाहणी केली. एका ड्राव्हरमध्ये असलेले सात हजार रुपये लुटारूंनी हिसकावून घेतल्याची माहिती शोरुममधील कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून तांत्रिक तपासाला गती

शोरूममध्ये असलेल्या चार सीसीटीव्ही कमेऱ्यांमध्ये लुटारूंची हालचाल कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त केला असून, त्यानुसार तपास सुरू आहे. तांत्रिक तपासाला गती देण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षकांकडून पाहणी

चोरीची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवा, पोलिस निरीक्षक धनाजी जळक आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत पाहणी केली. १२ रोजी सकाळी पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी देखील शोरूमला भेट देत संपूर्ण पाहणी करून पोलिसांना जलद गतीने तपासाच्या सूचना दिल्या.

पोलिसांची चार पथके रवाना

चाेरीची घटना घडताच पोलिस दल अलर्ट झाला असून, आरोपींच्या शोधात चार पथके रवाना करण्यात आलेली आहेत. महामार्ग, टोलनाका तसेच अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्याबाहेरही पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधार्थ रवाना झाल्याची माहिती आहे.

चाकू की बंदूक साशंकता

शोरूममध्ये दाखल झालेल्या लुटारूंकडे बंदूक होती की चाकू याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शाेरूममधील कर्मचाऱ्यांमध्ये लुटारूंकडे बंदूक असल्याची चर्चा होती. आरोपींना पकडल्यानंतरच ही बाब उघडकीस येणार आहे. मात्र, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले होते.

Web Title: The car was driven away from the 'showroom' by putting a knife on the neck of the security guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.