मतदार यादीतील घोळ तातडीने दुरुस्त करावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 05:37 PM2024-07-16T17:37:37+5:302024-07-16T17:39:27+5:30
आमदारांचे निर्देश: नागरिकांनी मांडल्या समस्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याने येथील मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागेल. मतदार यादीमधील हा घोळ दुरूस्त करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्यात यावीत, असे निर्देश आमदार डॉ. पंकज भोयर यांनी तहसीलदार संदीप पुंडेकर यांना दिले.
वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी, नालवाडी, साटोडा - आलोडी, म्हसाळा, सिंदी, सावंगी, बोरगाव, उमरी व अन्य मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे. यासाठी धावाधाव करावी लागली होती. अनेकांचे नाव मतदार यादीतून गहाळ झाल्याचे निर्दशनास आले होते. तथापि, अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. एकीकडे निवडणूक विभाग व प्रशासन मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्न करतात तर दुसरीकडे मतदार यादीतील घोळामुळे अनेकांना आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागल्याची परिस्थिती लोकसभा निवडणुकीदरम्यान समोर आली होती. हे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी पिपरीच्या सरपंच वैशाली अजय गौळकर, आलोडी साटोडाचे सरपंच बादल विरुटकर, पिपरीचे उपसरपंच गजानन वानखेडे, माजी पंचायत समिती सदस्य फारूख शेख, नालवाडीचे अजय वरटकर, पिपरी ग्रामपंचायतचे सदस्य वैभव चाफले, प्रशांत खंडारे, म्हसाळाचे संदीप पाटील, संदीप इंगळे, संदीप मारवाडी, अनंता राऊत, भाजपाचे उपाध्यक्ष जयंत कावळे, सालोडचे उपसरपंच आशिष कुचेवार, नेरी पुनर्वसनचे प्रवीण चोरे, गिरीश कांबळे, भाजपचे सेलू तालुका अध्यक्ष अशोक कलोडे व नागरिक उपस्थित होते.
अंतर वाढल्याने मतदार केंद्रावर गेलेच नाहीत
यावेळी पिपरीच्या सरपंच वैशाली गोळकार यांनी त्यांचे नाव एका मतदान केंद्रावर तर पती व सासरे यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर असल्याची माहिती दिली. अनेक मतदारांची नावे ते रहिवासी असलेल्या ठिकाणापासून दोन ते तीन किमी अंतरावर असल्याने त्यांना मतदान केंद्रापर्यंत जाताना अडचण झाली. तसेच अनेक नागरिक दूर केंद्र असल्याने मतदानाला देखील गेले नाहीत. हा गोंधळ संपूर्ण क्षेत्रात झाला होता, असेही आमदार भोयर म्हणाले. लगतच्या सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील याद्यांचे पुनर्गठन करण्यात यावे. ज्यांची नावे यादीतून सुटली, त्यांची नावे जोडण्यात यावीत तसेच रहिवासी ठिकाणापासून जवळचे मतदान केंद्र देण्यात यावे, अशी सूचना आमदारांनी केली.