उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळले रामनगर लीजचा प्रश्न त्वरित निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2022 10:38 PM2022-10-04T22:38:42+5:302022-10-04T22:39:31+5:30
ना. फडणवीस यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन शासन आदेश काढण्यात येईल, अशी घोषणा केली. अवघ्या दोन दिवसांतच वर्धेकरांना दिलेल्या आश्वासनावर विचार होत राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी ४ ऑक्टोबरला लीजच्या नूतनीकरणासंदर्भात शासन आदेश काढला आहे. या आदेशामुळे रामनगर येथील लीजधारकांच्या लीजचे २०५१ पर्यंत नूतनीकरण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील दीड वर्षापासून प्रलंबित असलेला वर्धा शहरातील रामनगर लीजचा प्रश्न अखेर निकाली निघाला. ही समस्या निकाली निघावी म्हणून आ. डॉ. पंकज भोयर यांनी पाठपुरवा करीत तशी मागणी गांधी जयंतीला वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ही समस्या लवकरच निकाली काढू, असे आवाश्वानही ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तर आता त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून ३० वर्षांसाठी मुदत वाढविण्यात आली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीसच्या या निर्णयामुळे रामनगरवासीयांना दिलासाच मिळाला आहे. विशेष म्हणजे लीज नृतनीकरणा अभावी रामनगरवासीयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. पण आता समस्या निकाली निघणार आहे.
भोयर यांनी २०१५ मध्येही केला होता पाठपुरावा
- राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत वर्धा शहरातील रामनगर परिसरातील लीज नूतनीकरणाचा प्रश्न शासन दरबारी लावून धरल्याने सन २०१५ मध्ये १९९१ ते २०२१ या तीस वर्षांच्या कालावधीसाठी लीजच्या नूतनीकरणास नगर विकास विभागाने मान्यता दिली होती. तर आता समस्या निकाली निघाल्याने रामनगरवासीयांना दिलासाच मिळणार आहे.
सत्ता परिवर्तन होताच पुन्हा केला पाठपुरावा
- शासन निर्णयानुसार नागरिकांच्या लीजचे नगर परिषदेने २०२१ पर्यंत नूतनीकरण करून दिले; परंतु लीजचा कालावधी सन २०२१ मध्ये संपल्याने पुन्हा नूतनीकरण करण्यासंदर्भात आ. भोयर यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, शासनपातळीवर याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. राज्यात सत्ता परिर्वतन झाल्यानंतर आ. डॉ. पंकज भोयर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भेट घेऊन लीजचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.
- आ. डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या समारोपीय कार्यक्रमात रविवार २ ऑक्टोबरला आ. पंकज भोयर यांनी रामनगर लीजचा प्रश्न सोडविण्याची मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
- ना. फडणवीस यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन शासन आदेश काढण्यात येईल, अशी घोषणा केली. अवघ्या दोन दिवसांतच वर्धेकरांना दिलेल्या आश्वासनावर विचार होत राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी ४ ऑक्टोबरला लीजच्या नूतनीकरणासंदर्भात शासन आदेश काढला आहे. या आदेशामुळे रामनगर येथील लीजधारकांच्या लीजचे २०५१ पर्यंत नूतनीकरण करण्यात आले आहे.
रामनगर लीजचा प्रश्न तातडीने सोडविला जाईल, असे आश्वासन आ. डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या समारोपीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यावर वर्धेकरांना दिलेले आश्वासन अवघ्या काही तासांतच पाळून समस्या निकाली काढली
आहे. त्यामुळे रामनगरवासीयांच्या वतीने आपण त्यांचे आभारच मानतो.
- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा.
१९६१ ते १९९१ पर्यंत झाले होते पुन: लीजचे नूतनीकरण
- वर्धा नपच्या कार्यक्षेत्रातील जुना मौजा सिंदी (मेघे)मधील शेत सर्व्हे क्रमांक १०४, ११०, ११४ मध्ये ७०७ भूखंड पाडून १९३१ ते १९६१ या कालावधीसाठी लीजवर दिले. कालांतराने या परिसराला रामनगर म्हणून ओळखल्या जाऊ लागले. सन १९६१ ते १९९१ पर्यंत पुन: लीजचे नूतनीकरण करण्यात आले आले.
असे असले तरी यानंतर लीजचे नूतनीकरण करण्यात न आल्याने येथील रहिवाशांसमोर मोठा प्रश्न
उभा झाला तर आता समस्या निकाली निघाली आहे.