वर्धा नदीच्या पात्रात होतोय १८६.८३ क्यूमेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 09:37 PM2022-07-06T21:37:03+5:302022-07-06T21:38:28+5:30
Wardha News सोमवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे.
वर्धा : सोमवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. या जलाशयात सध्या ७१.९६ टक्के जलसाठा असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून निम्न वर्धा प्रकल्पाचे सात दरवाजे ३० सेंमीने उघडण्यात आले आहेत. परिणामी वर्धा नदीपात्रात सध्या १८६.८३ क्यूमेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने वर्धा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाची पाणी पातळी २८२.७९० मीटर इतकी झाली असून, सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय निम्न वर्धा प्रकल्प उपविभाग-२ च्या उपविभागीय अभियंत्यांनी घेतला आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता या प्रकल्पाचे सात दरवाजे ३० सेंमीने उघडण्यात आले आहेत. निम्न वर्धा प्रकल्पाचे सात दरवाजे ३० सेंमीने उघडण्यात आल्याने वर्धा नदीपात्रात सध्या १८६.८३ क्यूमेक पाण्याचा विसर्ग होत आहे.