‘पिंकी’ला पिंजराबंद करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची ‘दिवाळी’ यंदा जंगलातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 09:34 PM2022-10-22T21:34:50+5:302022-10-22T21:35:34+5:30
स्वभावाने चिडकी पण चपळ आणि हुशार असलेली पिंकी ही वाघीण मागील २३ दिवसांपासून वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्धपणे लावलेल्या सापळ्याला हुलकावणीच देत आहे. असे असले तरी पिंकीला पिंजराबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे अधिकारी व कर्मचारी कर्तव्याला प्राधान्य देत दिवाळीच्या दिवसातही जंगलातच ठाण मांडून आहेत. पिंकीला पिंजराबंद केल्यानंतरच आम्ही यंदा कुटुंबीयांसह दिवाळी साजरी करू, असा विश्वास सध्या प्रत्यक्ष काम करणारे व्यक्त करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातील सर्वात छोट्या व्याघ्र प्रकल्प असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाची राणी अशी ओळख असलेल्या बीटीआर-३ कॅटरिना नामक वाघिणीची मुलगी असलेल्या बीटीआर-७ पिंकी नामक वाघिणीला पिंजराबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणाऱ्यांची दिवाळी यंदा जंगलात होणार असे चित्र आहे. विशेष म्हणजे स्वभावाने चिडकी पण चपळ आणि हुशार असलेली पिंकी ही वाघीण मागील २३ दिवसांपासून वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्धपणे लावलेल्या सापळ्याला हुलकावणीच देत आहे. असे असले तरी पिंकीला पिंजराबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे अधिकारी व कर्मचारी कर्तव्याला प्राधान्य देत दिवाळीच्या दिवसातही जंगलातच ठाण मांडून आहेत. पिंकीला पिंजराबंद केल्यानंतरच आम्ही यंदा कुटुंबीयांसह दिवाळी साजरी करू, असा विश्वास सध्या प्रत्यक्ष काम करणारे व्यक्त करीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील ती चमू अलर्ट मोडवर
- पिंकीला पिंजराबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत आहेत. मध्यंतरी चंद्रपूर येथील चमूला कारंजा येथे पाचारण करण्यात आले होते. सध्या ही चमू परतली असली तरी ती अलर्ट मोडवर असून माहिती मिळताच तातडीने कर्तव्य बजावण्यासाठी उपस्थित होणार आहे. तर तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू सद्य:स्थितीत जंगलात ठाण मांडून असल्याचे सांगण्यात आले.
वेळोवेळी तपासले जात आहेत जंगलातील सर्वच ट्रॅप कॅमेरे
- पिंकी वाघिणीचा मागोवा घेण्यासह तिच्या हालचालीवर लक्ष ठेवणे तसेच तिचे ठोस लोकेशन घेण्यासाठी वनविभागाच्या वतीने जंगलात तब्बल ५० हून अधिक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. सर्चिंग चमूंच्या वतीने हे ट्रॅप कॅमेरे वेळोवेळी तपासण्यात येत असून जंगलात कुठे वाघाचे पगमार्क तर नाही ना याचाही शोध घेतला जात आहे. असे असले तरी मागील २३ दिवसांपासून पिंकी विविध सापळ्यांना हुलकावणीच देत आहे.
तीन ठिकाणी केली पाळीव जनावराची शिकार
- संभाव्य धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांनी पिंकी (बीटीआर-७) या वाघिणीला पिंजराबंद करण्याचे आदेश २९ सप्टेंबरला निर्गमित केले आहेत. ३० सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीचा विचार केल्यास पिंकी नामक वाघिणीने जागा त्यानंतर आगरगाव तर त्यानंतर रहाटी येथे पाळीव जनावराची शिकार केल्याचे वास्तव आहे.
बारा चमू करताहेत प्रयत्न
- वनविभागाच्या नऊ तर बोर व्याघ्र प्रकल्पाच्या तीन अशा एकूण नऊ चमू बीटीआर-७ या वाघिणीला पिंजराबंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एकूणच सुमारे १५० हून अधिक मनुष्यबळ सध्या जंगलात पिंकीला जेरबंद करण्यासाठी ठाण मांडून आहे. विशेष म्हणजे पिंकीला पिंजराबंद करण्यासाठी महिला कर्मचारी पुरुष कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.