मद्यपींचा हिरमोड अन् काही पोलीस कर्मचाऱ्यांचे ‘बल्ले-बल्ले’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2022 10:05 PM2022-11-12T22:05:33+5:302022-11-12T22:06:28+5:30
वर्धा हा दारूबंदीचा जिल्हा असतानाही याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत होती. शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळांमध्ये देशी-विदेशींचे घोट रिचविले जात होते. शहरासह ग्रामीण भागात गावठी दारूभट्ट्यांनी आपले जाळे पसरविले होते. मात्र, पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी कार्यभार स्वीकारताच दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरासह जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा ध्यास पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी घेतला आहे. शहरासह जिल्ह्यातील दारूविक्रेते ‘अंडरग्राउंड’ झाले असून दारू मिळणे कठीण झाल्याने मद्यप्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. असे असतानाच जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील काही कर्मचारी बाहेरगावाहून, तर काही कर्मचाऱ्यांना गावातच अगदी सहजरीत्या दारू उपलब्ध होत असल्याने त्यांची ‘बल्ले बल्ले’ सुरू आहे. अशा काही मद्यपी कर्मचाऱ्यांवरही लगाम लावणे गरजेचे आहे.
वर्धा हा दारूबंदीचा जिल्हा असतानाही याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत होती. शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळांमध्ये देशी-विदेशींचे घोट रिचविले जात होते. शहरासह ग्रामीण भागात गावठी दारूभट्ट्यांनी आपले जाळे पसरविले होते. मात्र, पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी कार्यभार स्वीकारताच दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले. अवघ्या १६ ते १७ दिवसांतच त्यांच्या मार्गदर्शनात लाखोंचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त करून गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. शहरातील दारूविक्रेत्यांनी शहरातून पलायन केले. यामुळे मद्यप्यांना दारू मिळणे कठीण झाले.
जिल्ह्यात दारूची प्रभावी अंमलबजावणी सुरू असतानाच जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र सहजरीत्या दारू उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. काही कर्मचाऱ्यांना हॉटेलात, काहींना बाहेरगावाहून, तर काहींना गावातूनच दारू उपलब्ध होत असल्याने कर्तव्यावरदेखील ते मद्यधुंद अवस्थेत राहत असल्याचे चित्र आहे. हे वास्तव जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांत आहे. यावर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी लगाम लावणे गरजेचे आहे.
‘साहेबां’नी ठाणेदारांना द्याव्यात सूचना...
- जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्याची नितांत गरज आहे. शहरातील दारूविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो आहे, तसा काही मद्यपी कर्मचाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्याची गरज आहे; तरच पूर्णपणे दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी होईल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
ठरावीक हॉटेलात विशेष सेवा
- शहरालगत किंवा शहराबाहेरील काही ठरावीक ढाबे, हॉटेलांत काही पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष सोय उपलब्ध करून दिली जाते. ‘स्पेशल’ टेबल लावून कर्मचारी दारूचे घोट रिचवीत असल्याचे दिसून येत आहे. ही बाबही गंभीर आहे. शहरातील काही हाॅटेल्स तसेच शहरालगतच्या ढाब्यांवरही अशा कर्मचाऱ्यांची रात्रीच्या सुमारास मद्यपार्टी सुरू असते. हे विशेष !