"शिवसेनेचा अंत जवळ आलाय", नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 04:57 PM2022-10-02T16:57:12+5:302022-10-02T16:57:52+5:30
महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी) वर्धा येथे आयोजित सेवाग्राम औद्योगिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
वर्धा - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मोठे योगदान राहिले असून ग्रामीण स्वयंरोजगाच्या माध्यमातून आर्थिक संमृद्धीलाही चालना दिली. त्याचे हेच विचार घेवून वर्ध्यामध्ये ग्रामीण औद्योगिक प्रगतीचे लक्ष्य आहे. यासाठीच महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्थेच्या परिसरात महात्मा गांधींचे स्मारक उभारुन औद्यागिकीकरणाची माहिती आणि प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली. नारायण राणेंनी या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. तसेच, शिवसेनेचा अंत जवळ आलाय, असं भाकीतही त्यांनी केलं.
महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी) वर्धा येथे आयोजित सेवाग्राम औद्योगिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आपसात कॉर्डीनेट साधत आहे. परंतु यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कॉर्डीनेट नसून त्यांना कॉर्डिनेटची गरजच नाही. दसऱ्याच्या दिवशी कळेल आणि त्याच दिवशी त्यांचं पितळ उघड पडेल. शिवसेना तरी अस्तित्वात आहे का? उरलेले आमदारसुद्धा पक्ष सोडून जातील, असे राणेंनी यावेळी म्हटले.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी स्वतः मला मुख्यमंत्री केलं, तेव्हाही उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे लायक नाहीत. त्यांना महाराष्ट्राबद्दल काही जाण नाही. हिंदुत्वाशी गद्दारी करून ते निवडून आले आहेत, भारतीय जनता पक्षाशी बरोबरी करून मोदींच्या नावाने मत मागून निवडून आले आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी त्याग केला असेही ते म्हणाले. बाळासाहेब जिवंत असते तर उध्दव ठाकरे कधीही मुख्यमंत्री झाले नसते. शिंदे गट बरेचशे धक्के शिवसेनेला देत आहे, आता फक्त मला एवढीच काळजी आहे की या धक्क्यांना उद्धव ठाकरे नीट सांभाळून घेतील का, हाच प्रश्न आहे. शिवसेनेचा अंतजवळ आला आहे, असे भाकीतच केंद्रीय मंत्री राणे यांनी केले.
३८ एकर परिसरात महात्मा गांधींचे स्मारक
महात्मा गांधींच्या स्मारक निर्मितीकरिता येत्या सहा महिन्यामध्ये समितीचे गठण करुन येत्या अडीच वर्षात या ३८ एकराच्या परिसरात स्मारक पूर्णत्वास जाईल. या स्मारकाच्या माध्यमातून युवा पिढीला गांधींजींच्या ग्रामीण औाद्योगिक प्रगतीसंदर्भातील माहिती, प्रशिक्षण दिली जाईल. येथे येणाºया प्रत्येक पर्यटकांना एक वेगळी अनुभूती या स्मारकातून होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एमगिरीतील संचालकाचे पद रिक्त असून ऐत्या एक ते दीड महिन्यात हे पद भरले जाणार असून विदर्भातील व्यक्तीची नियुक्ती केली जाईल, असेही ना. राणे म्हणाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भानुप्रतापसिंह वर्मा, सूक्ष्म मंत्रालयाचे सचिव बी.बी.स्वैन, सहसचिन आणि अधिकारी आदी उपस्थित होते.