सेवाग्रामात साकारणार देशातील पहिले राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 05:00 AM2022-04-13T05:00:00+5:302022-04-13T05:00:18+5:30
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांशी प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प असून या प्रशिक्षण केंद्रात दीड वर्षाचे प्रशिक्षण अवघ्या सहा महिन्यांत दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनाचा हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, या हेतूने आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी खुद्द वर्धा गाठून सेवाग्राम येथे सोमवारी आढावा बैठक घेतली.
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी तसेच अमेरिका येथील नोंदणीकृत ‘जपायगो’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या सेवाग्राम येथे देशातील पहिले राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्र साकारले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांशी प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प असून या प्रशिक्षण केंद्रात दीड वर्षाचे प्रशिक्षण अवघ्या सहा महिन्यांत दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनाचा हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, या हेतूने आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी खुद्द वर्धा गाठून सेवाग्राम येथे सोमवारी आढावा बैठक घेतली. तब्बल तासभर चाललेल्या या बैठकीदरम्यान डॉ. अर्चना पाटील यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्यात.
एमएलसीयू स्थापनेनंतर सुरू होणार प्रत्यक्ष प्रशिक्षण
- एमएलसीयू (मीडवायफरी लेड केअर युनिट) स्थापन झाल्यावर सेवाग्राम येथील कस्तुरबा नर्सिंग स्कूलच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. एका बॅचच्या माध्यमातून जास्तीत जास्त ३० प्रशिक्षणार्थ्यांना एएनएमचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत दिला २५ लाखांचा निधी
- देशातील पहिल्या राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्रासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत २५ लाखांचा निधी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. तो निधी नुकताच सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीला वळता करण्यात आला आहे.
- हाच निधी राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्रासाठी खर्च होणार आहे.
विदेशी तज्ज्ञांनी केली जिल्ह्यातील प्रसूतीच्या सेवा-सुविधांची पाहणी
- इंटरनॅशनल ट्रेनर फॉर नर्स प्रॅक्टिशनर मीडवाईफ युकेच्या मिस पोला तसेच इंटरनॅशनल ट्रेनर फॉर नर्स प्रॅक्टिशनर मीडवाईफ युएसएच्या मिस केथ यांनी मंगळवारी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील रुग्णालयांना भेटी देत तेथील प्रसूतीच्या सेवा व सुविधांची माहिती जाणून घेतली. या विदेशी तज्ज्ञांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय, वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय, आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा तसेच खरांगणा (मो.) येथील आरोग्य उपकेंद्राला भेटी दिल्यात. याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. नितीन निमोदिया तसेच डॉ. प्रभाकर नाईक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सिव्हिल काम होणार ९० दिवसांत पूर्ण
- सेवाग्राम येथे साकारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्राचे सिव्हिल काम येत्या ९० दिवसांत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. लवकर प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे.
देशातील पहिले राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्र सेवाग्राम येथे साकारण्यात येणार आहे. त्यासाठी २५ लाखांचा निधी कस्तुरबा रुग्णालयाला वळता करण्यात आला आहे. मंगळवारी विदेशी तज्ज्ञांनी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रसूतीच्या सेवा-सुविधांची शासकीय रुग्णालय गाठून पाहणी केली.
- डॉ. रा. ज. पारडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.