मुलीचा विनयभंग भोवला, आरोपीस कारावास ठोठावला
By चैतन्य जोशी | Published: October 7, 2023 04:49 PM2023-10-07T16:49:47+5:302023-10-07T16:50:07+5:30
हा निर्वाळा प्रथमश्रेणी अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांनी दिला.
वर्धा : अल्पयवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी ईश्वर दादाराव पोयाम (३६ रा.हिवरा कावरे) याला एक वर्ष सश्रम कारवासाची शिक्षा आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्यात आली. हा निर्वाळा प्रथमश्रेणी अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांनी दिला.
प्राप्त माहितीनुसार, पीडिता नवव्या वर्गात असताना, १२ फेब्रुवारी, २०१६ रोजी सायंकाळच्या सुमारास घरी शौचालय नसल्याने ती नदीकाठावर शौचास गेली होती. दरम्यान, आरोपी ईश्वर पोयाम याने तिचा विनयभंग केला होता. ती घाबरून घरी गेली आणि सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्याच दिवशी रात्री आरोपी पीडितेच्या घरासमोरून जात असताना, पीडितेच्या वडिलांनी आरोपीला विचारणा केली असता, आरोपीने धक्काबुक्की करून, ‘तुमच्याने जे होते ते करून घ्या,’ असे म्हणत निघून गेला होता. याबाबतची तक्रार पीडितेच्या वडिलांनी पुलगाव पोलिसात दाखल केली होती.
प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका चौधरी यांनी करून, आरोपीविरुद्ध पुरावा गोळा करीत प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी सहायक फौजदार अनंत रिंगणे यांनी साक्षीदारांना हजर करून मोलाची कामगिरी बजावली. शासनातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता, पीडितेचे वडील, इतर साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी ईश्वर पोयाम याच्याविरुद्ध एका वर्षाची शिक्षा ठोठाविली.