अवकाळीचा कहर; बळीराजाचे स्वप्न भिजले, संकटाने मनही थिजले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:54 PM2023-11-29T12:54:02+5:302023-11-29T12:55:52+5:30
दुसरा दिवसही पावसाचा, शेतकऱ्याची दाणादाण, वीज पडल्याने सेलू-काटे शिवारात गाय दगावली
वर्धा : दुसरा दिवसही अवकाळी पावसाचाच निघाला. सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत सर्वदूर पावसाने धुव्वाधार हजेरी लावल्यामुळे शेतशिवारात पाणी साचले आहे. पांढऱ्या सोन्यावर शेतकऱ्यांचे मोठे स्वप्न होते. परंतु, या पावसात कपाशी भिजल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावरच पाणी फेरले आहे. तसेच तुरीचं बोनस पीकही या पावसाने हिरावून घेतलं आहे.
खरिपात पावसाअभावी फटका बसला तर आता अवकाळी पावसाने होतं नव्हतं सारं हिरावून घेतल्याने वारंवार येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मनही आता थिजून गेलं आहे. शेतकऱ्यांच्या पाठीमागे ही संकट मालिका कधीपर्यंत चालणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या पावसात सोमवारी सायंकाळी सहा वाजता सेलू-काटे शिवारात वीज पडल्याने गाय दगावली. तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.
चार हजार हेक्टरवर कपाशीचे नुकसान
आष्टी (शहीद) : तालुक्यात सोमवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. मंगळवारी पहाटेपर्यंत जोरधार सुरू असल्याने या पावसामुळे तालुक्यातील ४ हजार हेक्टरवरील कपशीचे, तर दीड हजार हेक्टरवरील तुरीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या वादळीपावसामुळे कपाशीसह तुरीही वाकून गेल्या आहेत. कापूस भिजून जमिनीवर पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील आष्टी, तळेगाव, भारसवाडा, लहानआर्वी, अंतोरा, साहूर या सर्व भागांतील कपाशी आणि तुरीच्या पिकाला फटका बसला आहे. वाऱ्यामुळे काही घरांवरील टिनाचे पत्रे उडाल्याने नागरिकांची दाणादाण उडाली.
पुलगाव परिसरालाही बसला अवकाळीचा फटका
पुलगाव : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पुलगाव परिसरातील पुलगाव, नाचणगाव, खातखेडा, कोळोणा, घोडेगाव, एकांबा, सोनोरा यांसह इतर गावांना चांगलाच फटका बसला. तूर आणि कपाशीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी पूर्णत: कोलमडून गेला आहे. या अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील गहू व चणा पिकांनाही बसणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
कापूस वेचणीच्या हंगामातच शेतकऱ्यांना दणका
विरुळ (आ.) : यावर्षी तसेही कापसाचे उत्पादन कमीच आहे. सध्या कापसाची वेचणी सुरू असून बहुतांश शेतकऱ्यांचे शेत पांढरे झाले आहे. अशातच आता अवकाळी पावसाने सोमवारपासून हजेरी लावल्याने कापूस भिजला. आता यामुळे कापसाची प्रत घसणार असून, शेतकऱ्यांना भावामध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. यावर्षी सोयाबीन हातचे गेले. आता अवकाळीमुळे कपाशी आणि तुरीलाही फटका बसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या दुहेरी संकटातून शेतकऱ्यांना सावरण्याकरिता तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले
सेवाग्राम : गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. अखेर सोमवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या पावसामुळे कापूस, तूर आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणितच बिघडवून टाकले आहे. सोयाबीनचा मोठा फटका बसल्यानंतर शेतकऱ्यांनी कपाशी आणि तुरीकरिता मोठी मेहनत घेतली. आता तेही पीक मातीमोल केल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहे.
अवकाळी पावसाची धुवाधार बॅटिंग
चिकणी (जामनी) : चिकणीसह परिसरात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार एंट्री केल्याने शेकडो हेक्टरवरील कपाशी आणि तुरीच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आणखी तीन दिवस अवकाळी पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे. चिकणी, पढेगाव, जामनी, दहेगाव परिसरातील कापूस भिजून तो जमिनीवर विखुरला आहे. तसेच तुरीचे पिकही जमिनीवर लोळले आहे. काही शेतांमध्ये पाणी साचून तलावाचे स्वरूप आले असून, पिकांना त्यापासून धोका आहे.
देवळी तालुक्यात धो-धो बरसला
देवळी : तालुक्यात मंगळवारी सकाळी ६ वाजपासून अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. दिवसभर पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मजुरांअभावी शेतामध्ये कापूस वेचायचा राहिला. पण, आता या पावसाने तो कापूस भिजवून टाकला आहे. पऱ्हाटीचा कापूस पावसाच्या दणक्याने खाली पडल्याने मातीमोल झाला. तुरीसह हरभऱ्यालाही चांगलाच मार बसला आहे. आधीच या हंगामात सोयाबीन व इतर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कास्तकारांचे कंबरडे मोडले आहे. त्यात या अवकाळी पावसाने आणखीच भर घातली आहे. तालुक्यात किती नुकसान झाले याची आकडेवारी अद्याप तलाठ्यांकडून प्राप्त व्हायची असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी दिली.
रोहणा परिसरालाही झोडपले
रोहणा : या परिसरात सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे कापूस भिजला असून, तुरीचा फुलोराही गळून पडला. काही भागांत तुरीच्या शेंगा धरायला सुरुवात झाली होती. त्या शेंगाही गळाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. जेव्हा आवश्यकता होती, तेव्हा पाऊस आला नाही. आता आवश्यकता नसताना पावसाने हजेरी लावून पिकांची वाट लावल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहे. शेतकरी हा संकटामध्ये सातत्याने भरडला जात असल्याने शासनाने आता मायबाप म्हणून पाठीशी उभे राहण्याची गरज व्यक्त होत आहे.