निर्घृणतेचा कळस; धाकट्याने थोरल्याला निद्रावस्थेतच केले ‘खल्लास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2023 21:29 IST2023-04-29T21:29:23+5:302023-04-29T21:29:48+5:30
Wardha News घरगुती कारणातून झालेल्या वादात संतापलेल्या धाकट्या भावाने चक्क निद्रावस्थेत असलेल्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. ही धक्कादायक घटना हिंगणी नजीकच्या देवनगर परिसरात २९ एप्रिल रोजी घडली.

निर्घृणतेचा कळस; धाकट्याने थोरल्याला निद्रावस्थेतच केले ‘खल्लास’
वर्धा : घरगुती कारणातून झालेल्या वादात संतापलेल्या धाकट्या भावाने चक्क निद्रावस्थेत असलेल्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. ही धक्कादायक घटना हिंगणी नजीकच्या देवनगर परिसरात २९ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी सेलू पोलिसांनी आरोपी भावाला अटक केल्याची माहिती दिली. रवींद्र बंडू तराळे (३२) असे मृतकाचे नाव आहे तर अमोल बंडू तराळे (२८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, हिंगणीनजीकच्या देवनगर येथील वॉर्ड ३ मध्ये दोन्ही भावंडे आई-वडिलांसोबत राहत होती. दोन्ही भावांत मागील काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. २९ रोजी दुपारच्या सुमारास मोठा भाऊ रवींद्र घरात झोपून असताना लहान भाऊ अमोल याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने रवींद्रच्या मानेवर तसेच चेहऱ्यावर जबर घाव घालून निर्घृण हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सेलू पोलिसांनी धाव घेत पंचनामा करीत आरोपी भावाला अटक केली. पुढील तपास पोलिस करीत असल्याची माहिती आहे.