अंगापेक्षा भोंगा मोठा; तीन महिन्यांत १८ जणांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2022 05:00 AM2022-05-01T05:00:00+5:302022-05-01T05:00:20+5:30
प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून धडक कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्याचा भरणा करून वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाईच केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्य लादून त्याची वाहतूक करणे कायदेशीर गुन्हाच आहे. अशा वाहनचालकांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभाग दंडात्मक कारवाई करते. ओव्हरलोडचा ठपका ठेऊन मागील तीन महिन्यांत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी तब्बल १८ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १८ हजारांचा दंड वसूल केला आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून धडक कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्याचा भरणा करून वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाईच केली आहे.
रात्री ओव्हरलोड आणि ओव्हारस्पीडही
१ रात्रीच्या सुमारास विविध रस्त्यांवर वाहनांची जास्त वर्दळ राहत नसल्याने तसेच ठिकठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारीही राहत नसल्याने याच संधीचे सोनं नियमांना बगल देणारे वाहन चालक करतात.
२ शहरातील विविध भागात दिवसाला वाहतूक पोलीस कर्तव्यावर राहतात. पण रात्रीच्या सुमारास या भागात पोलीस कर्मचारी राहत नसल्याने ओव्हरलोड तसेच ओव्हरस्पीड वाहने धावत असल्याचे वास्तव आहे.
३ ओव्हरलोड तसेच ओव्हरस्पीट वाहनांमुळे अपघाताचा जास्त धोका राहतो. पण सध्या रात्रीच्या सुमारास वर्धा शहरातून ही अवजड वाहने मनमर्जीनेच पळविली जात असल्याचे दिसून येते.
४ हजार ४३१ वाहनांची तपासणी
- मागील तीन महिन्यांच्या काळात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून तब्बल ४ हजार ४३१ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोषी वाहनचालकांवर विविध वाहतूक नियमांना बगल दिल्याचा ठपका ठेवून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात ओव्हरलोडची तब्बल १८ प्रकरणे असल्याचे सांगण्यात आले. वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने मोहीम पुढेही सूरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
मागील तीन महिन्यांत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने ओव्हरलोडचा ठपका ठेवून १८ वाहन चालकांकडून १८ हजारांचा दंड वसूल केला आहे. सुरक्षित प्रवास या हेतूने प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करायलाच हवे.
- धनाजी जळक, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.