जय हनुमान... पुराच्या पाण्यात वाहून आली मूर्ती, प्रवाहातही उभीच दिसल्याने आश्चर्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 09:47 AM2022-08-09T09:47:17+5:302022-08-09T09:50:22+5:30
मिळालेल्या माहितीनुसार कुटकी येथील रहिवासी मनोहर भुते हे वणा नदी परीसरात गेले असता त्यांना पाण्यात हनुमानजींची मूर्ती दिसली
वर्धा - पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे, जनजीवन विस्कळीत झाले असून काही गावांचा शहरांसोबतचा संपर्कही तुटल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कुटकी गावाजवळून वाहत असलेल्या वणा नदीच्या पुराच्या पाण्यात हनुमानाची मूर्ती वाहत आली होती. ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरताच गावकऱ्यांनी मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार कुटकी येथील रहिवासी मनोहर भुते हे वणा नदी परीसरात गेले असता त्यांना पाण्यात हनुमानजींची मूर्ती दिसली. त्यावेळी गावातील नागरिकांना त्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहातही सरळ उभी असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मूर्ती नेमकी कोठून वाहत आली, किंवा परिसरात आजूबाजूच्याठिकाणी कुठे मंदिर होते का, याची अद्याप कुठलीही स्पष्टता झाली नाही. मात्र, मूर्ती वाहत आल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
जिल्ह्यात पूरस्थिती, 9 दरवाजे उघडले
प्रकल्पात येवा वाढल्याने सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पाचे ९ दरवाजे ३० सेंमी सोमवारी सकाळी १० वाजता उघडण्यात आले असून १७२ घन.मी/से विसर्ग बोर नदी पात्रात सोडण्यात आला आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. सेलू तालुक्यातील बोरखेडी कला येथील सततच्या पाण्यामुळे नाल्याला पूर असून रस्ता बंद करण्यात आला होता. रात्री 2 च्या सुमारास 3 घरा मध्ये पाणी गेले असता सदर व्यक्तींना दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केली. कारंजा तालुक्यात रविवार पासून पडणाऱ्या सतत च्या पावसामुळे सावरडोह नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. हिंगणघाट तालुक्यातील पोथरा नदीच्या पुलावरून पाणी असल्याने सावंगी हेटी रस्ता बंद झाला आहे.