रेल्वेत नोकरीचे आमिष; फसवणूक करणारा गजाआड
By आनंद इंगोले | Published: October 9, 2023 07:52 PM2023-10-09T19:52:10+5:302023-10-09T19:52:17+5:30
दोन आरोपीला अटक : १३ लाख ५० हजारांनी घातला होता गंडा
वर्धा : रेल्वेमध्ये टीसी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नियुक्तपत्र देणे, वैद्यकीय तपासणी इतकेच नाही तर प्रशिक्षणाचा बनाव करुन १३ लाख ५० हजार रुपयांनी एका महिलेची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यासह मुख्य आरोपीला गजाआड केले. तिसरा मार्स्टरमाईंड आरोपीचा पोलिस शोध घेत आहे.
सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी रवींद्र अभिमान गुजरकर रा. वर्धा आणि मयूर दिलीप वैद्य रा. बल्लारशाह असे आरोपींचे नाव आहे. फिर्यादी सुनिता भास्कर देहारे रा. नालवाडी यांची रवींद्र गुजरकर यांनी मयूर वैद्य हा रेल्वेमध्ये मोठा अधिकारी असल्याचे सांगून ओळख करुन दिली. तेव्हा मयुरने सुनिता यांच्या मुलीला रेल्वेमध्ये टीसी पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नियुक्तीपत्र दिले. इतक्यावरच न थांबता वैद्यकीय तपासणी करुन सहारागंज दिल्ली येथे प्रशिक्षणही दिले.
याकरिता देहारे यांच्याकडून तब्बल १३ लाख ५० हजारांची रक्कम वसूल केली. पण, नंतर नोकरीचा काही थांगपत्ता नसल्याने हा सर्व बनाव असून आपली फसवणूक झाल्याचे सुनिता देहारे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपासचक्र फिरवून सुरुवातीला रवींद्र गुजरकर याला अटक केली. त्यानंतर मयुरचा शोध घेवून त्याला नागपुरातून अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता फसवणुकीच्या रक्कमेतून खरेदी केलेला टीव्ही जप्त केला.
मास्टरमाईंडचा शोध सुरु
या सर्व प्रकरणामध्ये गणेश गोटेफोडे रा.पालांदूर जि.भंडारा हा मास्टरमाईंड असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. फसवणूक करण्याकरिता फौजदारीपात्र कट रचल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हात वाढ करण्यात आली आहे. हे आरोनी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात भंडारा, गोंदिया व वर्धा येथे फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असून या प्रकरणाचा तपास वर्धा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश बैरागी करीत आहे.
नागरिकांना 'एसपीं'चे आवाहन
रेल्वेमध्ये नोकरीसाठी पैसे भरायची गरज नसते. रेल्वेमधील भरती ही गुणवत्तेनुसार होते. त्यामुळे कोणत्याही दलालांच्या आमिषाला बळी पडू नये. रेल्वेची भरती ही रेल्वे रिक्रुटमेंट सेल, मुंबई यांच्यावतीने घेतली जाते. त्याची लेखी परीक्षा मुंबईला होते. महाराष्ट्रात रेल्वेचे भुसावळ, मुंबई, सोलापूर, नागपूर व पुणे हे रेल्वेचे पाच विभाग असून येथेच वैद्यकीय तपासणी होते. दिल्लीला कधीही वैद्यकीय तपासणी होत नाही. रेल्वेमधील टीसी, गार्ड, लोको पायलट, स्टेशन मास्तर, तिकीट विभाग यांचे प्रशिक्षण हे भुसावळ येथे होत असून त्याचा कालावधी दोन ते तीन महिन्यांचा असतो. रेल्वेची शेवटची भरती २०१९ मध्ये झाली असून त्यानंतर भरती झालेली नाही, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आपली फसवणूक टाळावी किंवा कोणी आमिष दाखवत असेल तर त्याची पोलिसांत तक्रार करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी केले.