शेतकरी आत्महत्यांचा फास घट्ट; दीड वर्षात २०२ जणांनी संपविले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 04:31 PM2023-08-03T16:31:45+5:302023-08-03T16:32:27+5:30
वारसांना मदत मिळणार तरी कधी : पीडित कुटुंबांचा टाहो, प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे
वर्धा : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन मुख्य कारणांमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्यांप्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सहायक अनुदानाच्या रूपाने तातडीने मदत देण्यात येते. ऐन खरिपाच्या तोंडावर मदतीची घोषणा झाल्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना हातभार लागणार आहे. मागील दीड वर्षात जिल्ह्यात २०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यांत तब्बल ४८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा फास घट्ट होत चालला आहे, हे तितकेच खरे.
निसर्गाच्या भरवशावर बळीराजा पेरणी करतो. मात्र, या शेतकऱ्याला निसर्गाचा लहरीपणा नडतो. कधी कोरड्या दुष्काळाने तर कधी ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नष्ट होऊन बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा होतो आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच जातो. यातूनच नाइलाजाने शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर न सोडता शासनाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत दिली जाते. यातील ७० हजार रुपये कुटुंबीयांना प्रत्यक्ष दिले जातात. तर ३० हजार रुपये त्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जाते.
जिल्ह्यात सन २०२२ मध्ये १५४ तर यंदा ३० जूनपर्यंत सहा महिन्यांत ४८ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, यासाठी तातडीने निधी देण्याची तरतूद असतानाही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वेळेत मदत मिळाली नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
केवळ ६ प्रकरणं पात्र उर्वरित ३० प्रलंबित
जिल्ह्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ४८ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले. यापैकी केवळ ६ प्रकरणं मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून १२ प्रकरणं अपात्र ठरवित ३० प्रकरणं प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
मदत मिळणार तरी केव्हा ?
जिल्ह्यात यंदा ४८ जणांनी मृत्यूला कवटाळले असून अद्याप एकाही आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या वारसांना मदत मिळालेली नाही. जेव्हा की तत्काळ अनुदान देण्याचे आदेश असतानाही शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने मदत मिळणार तरी केव्हा, असा आर्त टाहो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांकडून होत आहे.
शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी
- जानेवारी - १०
- फेब्रुवारी - ०८
- मार्च - ११
- एप्रिल - १४
- मे - ०३
- जून - ०२