प्रेमसंबंधातून ‘ते’ बाळ ‘फुलले’ अन् तासाभरातच ‘नकोसे’ झाले; माता-पित्याने उकिरड्यावर फेकून दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 04:37 PM2022-06-11T16:37:24+5:302022-06-11T17:04:44+5:30
newborn infant found in trash can : प्रेमसंबंधातून फुललेले ते चिमुकले बाळ तासाभरात नकोसे झाले अन् निर्दयी माता-पित्याने बाळाला शरीरावर एकही कपडा न टाकता चक्क उकिरड्यावर फेकून दिले.
वर्धा : अवघ्या तासाभरापूर्वी जन्मलेले ते ‘बाळ’ अखेर प्रेमसंबंधातून ‘नकोसे’ झाले असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. नवजात बाळाला उकिरड्यावर फेकून देणाऱ्या निर्दयी माता-पित्याचा शोध कारंजा पोलिसांनी लावला आहे. माता-पिता सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती कारंजा येथील पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांनी दिली आहे.
एकाच गावातील रहिवासी असलेल्या तरुण-तरुणीची काही वर्षांपूर्वी मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. दोघेही लग्न करणार होते. त्यातूनच दोघांत जवळीक निर्माण झाली. लग्नापूर्वीच दोघांनीही शारीरिक संबंध ठेवले अन् त्यातून तरुणीला दिवस गेले. गर्भातील बाळ हळूहळू मोठे होत गेले. अखेर दोघांनीही ते बाळ न ठेवण्याचे ठरविले. दोघेही तरुणीच्या बोंदरठाणा येथील तिच्या मामाकडे गेले आणि घरीच तरुणीची प्रसूती करून प्रेमसंबंधातून फुललेले ते चिमुकले बाळ तासाभरात नकोसे झाले अन् निर्दयी माता-पित्याने बाळाला शरीरावर एकही कपडा न टाकता चक्क उकिरड्यावर फेकून दिले. कारंजा पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ बाळाच्या माता पित्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत करीत आहे.
निर्दयी माता-पिता गारपीट येथील रहिवासी
तरुण-तरुणी हे दोघेही बोंदरठाणा गावाच्या काही अंतरावर असलेल्या एका गावातील रहिवासी आहेत. लग्नापूर्वीच तरुणीला गर्भधारणा झाल्याने बदनामीच्या भीतीने दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
दोघेही करणार हाेते लग्न पण...
तरुण-तरुणी दोघेही एकमेकांशी लग्न करणार होते. मात्र, लग्नापूर्वीच तरुणी गर्भवती राहिल्याने बदानामीच्या भीतीपोटी तरुणी बोंदरठाणा येथे तिच्या मामाकडे गेली. तेथेच तिची प्रसूती करण्यात आली अन् ते चिमुकलं बाळ दोघांनी उकिरड्यावर फेकून पोबारा केला.
मामासह ‘त्या’ डाॅक्टरवर होणार का कारवाई?
निर्दयी माता-पिता कारंजा पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, तरुणीची प्रसूती करण्यास मदत करणाऱ्या मामा आणि त्या डॉक्टरावर पोलीस कारवाई करणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांना विचारणा केली असता त्यांनी सध्या प्रकरण तपासात असल्याने कुणालाही सहआरोपी केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
कायदेशीर कारवाईनंतर बाळ करणार सुपूर्द
कारंजा पोलिसांनी याप्रकरणी महिला व बालकल्याण समितीला माहिती दिली आहे. बालकल्याण समितीकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत असून यानंतरच ते चिमुकले बाळ त्याच्या माता-पित्याच्या सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या बाळावर वर्ध्यातील सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवल्याची माहिती आहे.