जिल्ह्यातील राजकारणामध्ये महिलांचा टक्का अद्याप कमीच !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 06:25 PM2024-11-07T18:25:45+5:302024-11-07T18:28:02+5:30
आतापर्यंत दोनच महिलांना संधी : यंदाच्या निवडणुकीत सहा महिला रिंगणात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याच्या राजकारणात महिलांचा टक्का प्रारंभापासूनच कमीच असल्याचे चित्र असून विधानसभा निवडणूकही त्यास अपवाद नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जिल्ह्याचा एकंदरित विचार केल्यास केवळ दोनच महिलांना देवळी विधानसभा क्षेत्रातून विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांचा राज्याच्या राजकारणात तसा टक्का फारच कमी आहे.
आजपर्यंत देवळी विधानसभा मतदारसंघातून दोन महिलांनी विधिमंडळ गाठले होते. यामध्ये पहिल्यांदा स्व. प्रभा राव आणि दुसऱ्यांदा सरोज काशिकर यांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील लोकसभाच नव्हे तर, विधानसभेत महिला पोहोचल्याच नाहीत. म्हणजेच दोनच महिलांना संधी मिळाली आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर केवळ दोनच महिलांना मिळालेली संधी पाहता महिलांचा जिल्ह्याच्या राजकारणातील टक्का तुलनेने कमीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा टक्का मोठा आहे. मात्र, तो तिथपर्यंत मर्यादित राहिला आहे. त्याची व्याप्ती विधिमंडळ किंवा संसदेपर्यंत पोहोचलीच नसल्याचे जिल्ह्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. यंदाही फक्त सहाच महिला रिंगणात आहेत.
जिल्ह्याच्या लोकसंख्येत मागील पाच वर्षात वाढ झाली आहे. पुरुषांबरोबरच महिलां मतदारांची संख्याही निर्णायक असते. त्यामुळे निवडणुकांमध्ये महिलांनाही संधी दिल्यास त्या देखील जिल्ह्याचे नेतृत्व करु शकेल.
गेल्या निवडणुकीत एकच महिला रिंगणात
- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून फक्त एकाच महिलेने भाग्य आजमावले होते. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मंदा रमेश ठावरे या अपक्ष उमेदवार होत्या.
- विशेष म्हणजे, अन्य तीन विधानसभा मत- दारसंघातून महिला रिंगणात उतरल्याच नव्हत्या. महिलांना विधानसभेची तिकीट दिली जात नसल्याचेही आताच्या राजकार- णातून दिसून येत आहे.
यंदा सहा महिला निवडणुकीसाठी इच्छुक
यंदाच्या निवडणुकीमध्ये सात महिला निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मयुरा काळे, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टीच्या वर्षा कन्नाके, मंगला ठक अपक्ष, देवळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून अश्विनी शिरपू- रकर, माधुरी डाहारे अपक्ष तर वर्धा विधानसभा मतदारसंघातून स्मिता नगराळे अपक्ष अशा सहा महिला उमेदवार रिंगणात आहे.
मतदानाचा टक्का होता जास्त
२०१९ च्या निवडणुकीत महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांच्या तुलनेत कमी दिसून आला. त्यावेळी ५,५३,१३३ महिला मतदारांनी मतदान केले होते.
टक्केवारी बघितल्यास ६० महिलांनी मतदान केले होते. त्यामुळे यंदाही महिलांच्या मतदानाचा टक्का वाढविण्याचीही गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.