येळाकेळीतून बेपत्ता झालेल्या विवाहितेला विकण्याचा ‘प्लॅन’ पोलिसांनी उधळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 11:46 AM2023-10-21T11:46:19+5:302023-10-21T11:47:29+5:30

सेलू पोलिसांची यशस्वी कारवाई : बिहार राज्यातील पिरापुरा मथुरातून घेतले ताब्यात

The police foiled the 'plan' to sell the married woman who had gone missing from Yelakeli Wardha | येळाकेळीतून बेपत्ता झालेल्या विवाहितेला विकण्याचा ‘प्लॅन’ पोलिसांनी उधळला

येळाकेळीतून बेपत्ता झालेल्या विवाहितेला विकण्याचा ‘प्लॅन’ पोलिसांनी उधळला

वर्धा : विवाहित महिलेला आमिष दाखवून पळवून नेत नेपाळ येथे विकण्याचा प्लॅन सेलू पोलिसांनी उधळून लावला असून महिलेला बिहार राज्यातील पिरापुरा जिल्ह्यातील मथुरा गावातून सुरक्षितरित्या ताब्यात घेत कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. प्राप्त माहितीनुसार, येळाकेळी येथील रहिवासी २१ वर्षीय विवाहितेला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले होते. याबाबतची तक्रार तिच्या पतीने १५ ऑगस्ट रोजी सेलू पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने महिलेच्या शोधार्थ तपास सुरू केला. मात्र, महिलेचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र, तांत्रिक तपासाच्या मदतीने महिला बिहार राज्यात असल्याची माहिती मिळाली आणि तेथून तिला विकण्याचा प्लॅन असल्याचे पोलिसांना समजले.

महिलेने जाण्यापूर्वी तिच्या फेसबुक मॅसेंजरवर मेसेज पाठविला होता यावरून पोलिसांनी तपासाला दिशा दिली असता तांत्रिक तपासाच्या मदतीने तिचा ठावठिकाणा कुठे आहे ते समजले.

पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक धनंजय पांडे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, रुख्साना शेख यांचे पथक बिहार राज्यासाठी रवाना झाले. महिलेचे लोकेशन बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील पिरापुर मथुरा गावात दिसून आले. मात्र, ते गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने आणि संवेदशील असल्याने महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे होते. मात्र, पोलिसांनी अथक परिश्रम घेत विविध संकटांना सामोरे जात बेपत्ता महिलेस ताब्यात घेत सुरक्षितरित्या सेलू पोलिस ठाण्यात आणून तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

सतत दोन महिने तपास अन् मिळाले यश..

ऑगस्ट महिन्यात येळाकेळी येथून बेपत्ता झालेल्या महिलेस शोधण्यासाठी सेलू पोलिसांची चमू विविध जिल्ह्यात रवाना झाली होती. मात्र, महिलेचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून महिलेचा सुगावा लागला. दोन महिन्यानंतर महिलेस बिहार राज्यातून ताब्यात घेतले अन् पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

‘त्या’ गावात इतर राज्यातील महिलांचाही उपस्थिती

प्राप्त माहितीनुसार, ज्या गावात बेपत्ता महिला मिळून आली त्या गावापासून नेपाळ बॉर्डर अतिशय जवळ असल्याने त्या गावातून अशा महिलांना विकण्याचे काम होणार होते. गावात विविध राज्यातील महिला व मुलींची देखील उपस्थिती होती. अशातच सेलू पोलिसांच्या पथकाने गाव गाठून क्षणाचाही विलंब न करता महिलेला ताब्यात घेतले.

Web Title: The police foiled the 'plan' to sell the married woman who had gone missing from Yelakeli Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.