वीजपुरवठा खंडित करून मध्यरात्री व्यावसायिकांची दुकाने केली जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2022 05:00 AM2022-06-26T05:00:00+5:302022-06-26T05:00:06+5:30
सारवाडी गावातील बसस्थानकालगत नागपूर-अमरावती महामार्गावर दुकाने आहेत. मागील ४० वर्षांपासून ही दुकाने लावण्यात येत असून दुकानांवरच त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र, गावातीलच पाच ते सहा गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने कोणतीही पूर्वसूचना न देता संपूर्ण सहाही दुकाने जमीनदोस्त केली. यामुळे व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सर्व आराेपींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांनी निवेदनातून करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील ४० वर्षांपासून काही व्यावसायिकांनी सारवाडी गावातील बसस्थानकालगतच्या गावठाणच्या जागेवर स्वखर्चाने छोटी-मोठी दुकाने थाटून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, १९ जून रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास पाच ते सहा जणांनी संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित करून जेसीबीच्या सहाय्याने व्यावसायिकांची सहाही दुकाने जमीनदोस्त केली.
यामुळे मात्र, व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून पाचही आरोपींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, तळेगावचे पोलीस निरीक्षकांना निवेदनातून केली आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रमोद अजाब सरोदे रा. पारडी, नंदकिशोर ज्ञानेश्वर सिरस्कार, रा. किन्हाळा, गजानन रामराव मिरासे रा. सारवाडी, शेख शब्बीर शेख शहादुल्ला रा. तळेगाव यांची सारवाडी गावातील बसस्थानकालगत नागपूर-अमरावती महामार्गावर दुकाने आहेत. मागील ४० वर्षांपासून ही दुकाने लावण्यात येत असून दुकानांवरच त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र, गावातीलच पाच ते सहा गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने कोणतीही पूर्वसूचना न देता संपूर्ण सहाही दुकाने जमीनदोस्त केली. यामुळे व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सर्व आराेपींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांनी निवेदनातून करण्यात आली आहे.
पोलिसांना दिली होती मागीलवर्षीच पूर्वसूचना
- आरोपींनी गावठाणची जागा रिकामी करण्यासाठी सर्व व्यावसायिकांना धमकीही दिली होती. व्यावसायिकांनी १९ ऑगस्ट २०२१ रोजी याबाबत तक्रार दाखल केली होती. तेव्हा पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली होती. मात्र, १९ जून २०२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सहा दुकाने जमीनदोस्त करण्यात आल्याने व्यावसायिकांनी तक्रार दिली असता पोलिसांनी एफआयआर दाखल केला. जर तेव्हाच पोलिसांनी दखल घेतली असती तर आज ही परिस्थिती व्यावसायिकांवर ओढावली नसती हे मात्र तितकेच खरे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे.
साहित्यांसह रोख रक्कमही नेली चोरून
- व्यावसायिकांनी दुकानात जात पाहणी केली असता अनेक साहित्य तसेच पैसे दिसून आले नाही. प्रमोद सरोदे यांच्या दुकानातील सिलिंडर, बेंच, टेबल रोख चोरुन नेली. नंदकिशोर सिरस्कार यांच्या दुकानातील रक्कम व सलूनच्या उपयोगातील वस्तू चोरल्या. गजानन मिरासे यांच्या दुकानातील साहित्य, शेख शब्बीर यांच्या गादी दुकानातून कापड, कापूस, रुई चोरली.
जेसीबीसह वाहने पोलिसांनी जप्त करावी
- मध्यरात्रीच्या सुमारास कोणतीही पूर्वसूचना न देता काही भाडोत्री गुंडांनी व्यावसायिकांची दुकाने जमीनदोस्त करून साहित्य चोरून नेल्याने, गुन्ह्यात वापरलेले जेसीबी तसेच इतर वाहने जप्त करून आरोपींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.