'एनर्जी ड्रिंक' मुळे मुलांना वाढलाय हृदयविकाराचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 05:10 PM2024-08-02T17:10:18+5:302024-08-02T17:11:19+5:30

ताकदीसाठी फळे खावीत : आरोग्यावर होतात विपरीत परिणाम

The risk of heart disease has increased in children due to 'energy drink'! | 'एनर्जी ड्रिंक' मुळे मुलांना वाढलाय हृदयविकाराचा धोका!

The risk of heart disease has increased in children due to 'energy drink'!

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मुलांमध्ये एनर्जी ड्रिंक घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या ड्रिंकमध्ये केमिकलचे प्रमाण बरेच असल्याने मुलांना हृदयविकाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे एनर्जी ड्रिंकचे सेवन करताना काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.


एनर्जी ड्रिंक्सच्या सुरक्षेबाबत नियमनाचा अभाव आहे. तसेच तरुणांना आकर्षित करण्यासाठी या पेयांचे मार्केटिंग केले जाते. एनर्जी ड्रिंक्समध्ये असलेल्या घटकांपैकी कॅफेन हा सर्वात सामान्य घटक असल्याने त्याचे दुष्परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. ड्रिंक्समध्ये असलेले कॅफेन हे एकाग्रता आणि सतर्कता वाढविण्यासाठी आहे. परंतु या कॅफेनमुळे अस्वस्थता, हृदयाचा ठोका वाढणे आणि निद्रानाश यासारखी काही लक्षणे उद्भवू शकतात.


कॅफेनच्या हाय डोसमुळे हायपरटेन्शन, पल्पिटेन्शन, कॅल्शियमची कमतरता निर्माण होणे यासह अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. एनर्जी ड्रिंक्सचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे मानसिक आरोग्य खराब होणे, हृदय व रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम होणे आदी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


युवकांमध्ये एनर्जी ड्रिंक्सची क्रेझ
शहरी भागातील मुले व युवकांमध्ये एनर्जी ड्रिंकची क्रेझ अलीकडे वाढली आहे. अनेकजण मेडिकल स्टोअर्समधून ते नेत असतात.


दूरगामी दुष्परिणाम
या पेयांमध्ये असलेली साखर दातांचे एनॅमल खराब करू शकते. ज्यामुळे कॅव्हिटी आणि दात अतिसंवेदनशील होणे, यासारख्या समस्या उद्भवू शकतात. बऱ्याच काळासाठी एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्यास शरीरावर परिणाम होऊ शकतो.


प्रमाणाबाहेर साखर व कॅफेन
एनर्जी ड्रिंकमध्ये प्रमाणापेक्षा साखर व कॅफेन समाविष्ट आहे. याचे सेवन करणाऱ्यांच्या शरीरावर मोठे परिणाम होतात. शाळकरी मुले व लहान बालकांनी एनर्जी ड्रिंकचा नाद सोडून द्यावा. त्याऐवजी फळे व पौष्टिक आहार घ्यावा, जेणेकरून मुलांची शक्ती वाढविण्यास मदत होईल.


एनर्जी ड्रिंक अत्यंत घातक

लिव्हर आणि किडनीलाही धोका :
आपले शरीर फक्त साखरेवर चालते. आपण जे काही खाते ते ग्लुकोज (साखर) मध्ये रूपांतरीत करूनच शरीर वापरण्यास सक्षम असते. पण, जास्त साखर खाल्ल्यास ती यकृतातही जाते. या अतिरिक्त्त साखरेचे यकृतातील फॅटमध्ये रूपांतर होते. जेव्हा जास्त चरबी यकृतामध्ये जमा होण्यास सुरुवात होते तेव्हा ते रक्तप्रवाहात पाठवू लागते.


हृदयासंबंधी आजाराचा धोका :
एनर्जी ड्रिकमध्ये विविध प्रकारचे रसायन राहत असल्याने हृदयासंबंधी आजार बळावण्याची शक्यता अधिक असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


लठ्ठपणा वाढतो :
एनर्जी ड्रिक वारंवार तसेच अधिक काळपर्यंत सेवन केल्यास लठ्ठपणा वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यातून इतरही आजार होतात.


मानसिक समस्या :
एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे सेवनामु‌ळे मानसिक आजारावरही परिणाम होतो, असे मानसिक रोगतज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.


"स्पोर्ट ड्रिंक्समध्ये सहसा जास्त साखर आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात. जे झटपट ऊर्जा देतात, परंतु त्या बदल्यात त्यापेक्षा जास्त नुकसान करतात. एनर्जी ड्रिक्सचा तुमच्या झोपेवरही परिणाम होतो. कमी झोप घेतल्याने थकवा, अशक्तपणा आणि आळस वाढू शकतो. एनर्जी ड्रिक्सऐवजी नैसर्गिक पद्धतीने शरीराला ऊर्जावान ठेवण्याचा प्रयत्न करणे केव्हाही चांगले. यासाठी फायबर, मॅग्नेशियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा आहारात समावेश असावा.
त्याचा किडनीवर परिणाम होतो."
- डॉ. सचिन पावडे, बालरोग तज्ज्ञ, वर्धा.
 

Web Title: The risk of heart disease has increased in children due to 'energy drink'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.