साहेब, रस्ता खोदलाय; बांधकाम कधी? रखडलेल्या कामामुळे नागरिकांना वाहतुकीचा मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 04:24 PM2024-08-26T16:24:53+5:302024-08-26T16:29:03+5:30
कंत्राटदाराचे काम आस्तेकदम: सिंदी (मेघे) ते शांतीनगर रस्त्याची झाली दैनावस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) ते शांतीनगर चौकापर्यंतच्या सिमेंटीकणाचे काम गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू आहे. कंत्राटदाराने एका बाजूने रस्ता खोदून ठेवला असून कामाला गती नसल्याने या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना वाहतुकीचा चांगलाच मनस्ताप होत असून 'साहेब, रस्ता खोदलायः बांधकाम होणार कधी? असा प्रश्न विचारला जात आहे.
शहरासह लगतच्या ग्रामपंचायत परिसरातील रस्त्यांचीही कामे हाती घेण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ही सिमेंटीकरणाची कामे होत असून या रस्त्याचा मुख्य कंत्राटदार वेगळा आणि काम करणारा कंत्राटदार वेगळा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पेटी कंत्राटदारही मनमर्जीने काम करीत असून अधिकाऱ्यांचीही हातचेपी भूमिका राहत असल्याचे दिसून येत आहे. सिंदी (मेघे) ते शांतीनगर चौकापर्यंतच्या १.०१ किलोमीटर रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे कंत्राट मुंबई येथील एसआरके कंपनीला १३ कोटी रुपयांत दिले आहे. परंतु या रस्त्याचे काम माया तिवारी नामक कंत्राटदार करीत आहे. साधारणतः दोन ते अडीच महिन्यांपासून हा रस्ता एका बाजूने खोदून ठेवला असून कामाची गती फारच मंद असल्याने एका बाजूने वाहतूक करताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका बाजुने रस्त्याचे खोदकाम केले तर दुसऱ्या बाजुने वाहतूक सुरु असलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहे. त्या खड्यात पाणी साचले असून त्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. या मार्गावर चांगलीच वर्दळ राहत असून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे
सुरक्षा कठडे नसल्याने अपघाताचा धोका
सिंदी (मेघे) ते शांतीनगर चौक हा रस्ता पुढे बायपास, नागठाणा व उमरीकडे जात असल्याने या रस्त्यावर सतत वर्दळ असते. कंत्राटदाराने हा रस्ता एका बाजूने चांगलाच खोदून ठेवला असून कामही धिम्यागतीने सुरू आहे. खोदकाम केलेल्या रस्त्याच्या बाजूला सुरक्षा कठडे नसल्याने रात्रीच्या सुमारास नवख्या वाहनचालकांना हे खोदकाम लक्षात येत नाही. त्यामुळे वाहने सरळ खोदलेल्या भागात शिरत असल्याचे दिसून येत आहे. अपघाताचे प्रमाण वाढत असून सुरक्षा व्यवस्था करण्याचीही गरज व्यक्त होत आहे.
वेळेत काम पूर्ण करणार का?
सार्वजनिक बांधकाम विभागा- कडून ज्या कंत्राटदार कंपनीला काम दिले त्या कंपनीने वर्ध्यातील माया तिवारी नामक कंत्राटदाराला हे काम दिले आहे. दिलेल्या मुदतीत काम करण्याचा करारनामा झाला असला तरी तिवारी नामक कंत्राटदाराने काम कालावधीत पूर्ण केल्याचे ऐकिवात नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनापाणी चौक या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आरती चौकाचे कामही कालावधीत पूर्ण केले नाही. त्यामुळे सिंदी (मेघे) ते शांतीनगर चौक या रस्त्याचे काम तरी कालावधीत पूर्ण करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
"सिदी (मेघे) ते शांतीनगर चौक या मार्गाच्या सिमेंटीकरणाचे कंत्राट मुंबईच्या कंपनीला दिले असून वर्ध्यातील माया तिवारी हे काम करीत आहेत. दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली असून पावसाळ्यामुळे सुरुवातीला मुरुमाची अडचण होती. आता मुरुम टाकण्यात आला असून जीएसीबीचे कामही झाले आहे. लवकरच उर्वरित कामे पूर्ण केली जातील. पावसामुळे या रस्त्याच्या कामाची गती कमी झाली."
- स्वप्नील खंडार, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग