धावत्या मालवाहू वाहनाने घेतला पेट; चालक बचावला, वाहतूक खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 03:24 PM2022-04-04T15:24:27+5:302022-04-04T15:43:39+5:30
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
समुद्रपुर (वर्धा) : जाम गिरड मार्गावर समुद्रपूर जवळील वाघेडा रस्त्यावरील मेहरबाबा मंदिराजवळील बायपासवर धावत्या मालवाहू ॲपेला अचानक आग लागली. यावेळी चालकाच्या सर्तकतेमुळे जीवितहानी टळली तर, वाहनाचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मिळालेल्या माहिती मालवाहू ॲपेला हा हिंगणघाट येथील बाजार समिती शेतीमाल खाली करून गिरड येथे परत येत होता. दरम्यान, समुद्रपुर जवळील बायपासवर अचानक आग लागली. यावेळी चालक अक्षय भिसेकर, याने वेळीच प्रसंगावधान राखत वाहनातून उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचले. काही मिनटातच मालवाहू वाहन जळून खाक झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
ही गाडी गिरड येथील विजय खडके यांच्या मालकीची असून या आगीत मालवाहू वाहनाचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी निलेश पेटकर यांनी आपल्या सर्कायासह घटनास्थळी जाऊन जमा झालेल्या गर्दी हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या आगीची नोंद समुद्रपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन पुढील तपास सुरू आहे.