शेतकऱ्यांच्या आयुष्यात नुकसानाचे व्रण कायम! १०० गावांतील तेरा हजार शेतकरी बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:01 IST2025-01-20T18:00:02+5:302025-01-20T18:01:53+5:30
Wardha : ऑक्टोबरच्या पावसात ८,६३४ हेक्टरवरील पीक बाधित

The scars of loss remain in the lives of farmers! Thirteen thousand farmers from 100 villages are affected
चेतन बेले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाच्या जखमा कमी होत नाही तोच पुन्हा परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात नुकसान केले होते. यात तब्बल १२ हजार ९७० शेतकऱ्यांच्या ८,६३३.९९ हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. नुकसानभरपाईसाठी शासनदरबारी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव सादर केला; मात्र अद्याप निधी प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे व्रण कायम आहेत.
पावसाळ्याचा पहिला महिना कोरडा गेला. नंतर झालेल्या पावसाने दाणादाण उडविली. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात अनेक तालुक्यात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.
त्याचे वितरण सुरू आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळालेली नाही. ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे देवळी, आर्वी तालुक्यांला फटका बसला. या दोन तालुक्यांतील १०० गावांतील १२, ९७० शेतकऱ्यांचे ८,६३३.९९ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
३२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ३० कोटी रूपये झाले जमा
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २७,१३१.८० हेक्टरवर नुकसान झाले होते. त्यासाठी ३६ कोटी २१ लाख ७६ हजार ६७० रुपयांचा प्रस्ताव सरकार कडे पाठवला व शेतकाऱ्याच्या खतात ३० कोटी २० लाख ५२ हजारांचा निधी जमा झाला.
११.७६ कोटींचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात
ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीत १०० गावांतील ८ हजार ६३३.१९ हेक्टरवरील पिके बाधित झाली होती. नुकसानापोटी शासनाकडे जिल्हा प्रशासनाकडून ११ कोटी ७६ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त झाला नसल्याचे आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले आहे.
"जुलै-सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानभरपाई निधी प्राप्त झाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी केली नसेल त्यांनी केवायसी करून घ्यावी. ऑक्टोबर महिन्यातील नुकसानाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. निधी प्राप्त होताच त्याचे वितरण केले जाणार आहे."
- शुभम घोरपडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वर्धा