शाळेचे फेर मूल्यांकन करावे, अन्यथा आमरण उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 05:49 PM2024-09-26T17:49:59+5:302024-09-26T17:51:05+5:30

शाळा व्यवस्थापन समितीचा इशारा : तक्रारीनंतरही कानाडोळा

The school should be re-evaluated, otherwise will protest | शाळेचे फेर मूल्यांकन करावे, अन्यथा आमरण उपोषण

The school should be re-evaluated, otherwise will protest

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान टप्पा-२अंतर्गत झालेल्या तालुकास्तरीय मूल्यांकनात प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी भेदभाव केला. त्यामुळे शाळेचे तालुकास्तरीय फेरमूल्यांकन करावे. तसेच शाळा पहिल्या तीन क्रमांकात आल्यास पुरस्काराची रक्कम प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावी, अशी मागणी कारंजा तालुक्यातील सुसंद येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी निवेदनातून केली होती; पण कार्यवाही झाली नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना आमरण उपोषणाचा इशारा दिला. याकरिता २६ सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता.


राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रति उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान टप्पा-२ राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत कारंजा पंचायत समितीअंतर्गत येणारी सुसंद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाही सहभागी होती. नियमानुसार कारंजाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंकज तायडे यांनी तालुकास्तरीय समिती गठीत न करता आपल्या मर्जीतील प्रभारी केंद्र प्रमुखांचा चार्ज असलेल्या शिक्षकांस सोबत घेऊन शाळेचे मूल्यांकन केले. 


यात मर्जीतील शाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक दिलेत. त्यामुळे आमची शाळा पहिल्या तीन क्रमांकात असतानाही मागे राहिली. त्यामुळे फेर मूल्यांकन करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल वाटगुळे यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनातून केली होती परंतु अद्यापही फेर मूल्यांकन झाले नसल्याने पुन्हा शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन २६ सप्टेबरपर्यंतचा अल्टिमेटम देत दालनात बसून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यामुळे आता शाळा व्यवस्थापन समिती उपोषण करणार की, फेर मूल्यांकन होणार? याकडे लक्ष लागले आहे. 


शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सुसंद येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने ६ सप्टेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे तक्रार करून तालुकास्तरीय शाळा मूल्यांकनात झालेल्या गैरप्रकार लक्षात आणून दिला होता. तसेच फेरमूल्यांकन करुन प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. नीतू गावंडे यांनी १२ सप्टेंबर रोजी कारंजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तालुकास्तरीय मूल्यांकन समितीकडून फेर मूल्यांकन करावे व अहवाल सादर करावा, असे आदेश दिले होते; पण अद्यापही या समितीने फेर मूल्यांकन केले नसल्याचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी सांगितले. 


रकाना कोरा ठेवला, पेन्सीलने नोंद घेतली

  • तालुकास्तरीय मूल्यांकन समितीने कोणत्याही प्रकारचा कार्यालयीन आदेश न काढता अनधिकृतपणे ५ सप्टेंबरला दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सुसंदचे मूल्यांकन केले. 
  • या मूल्यांकनादरम्यान एक महिला कर्मचारीही होत्या. प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मर्जीतील शिक्षकांना सोबत घेऊन मूल्यांकन केले. 
  • या समितीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सेवाज्येष्ठ विस्तार अधिकारी या पदाचे एकही व्यक्ती नव्हते. मुख्याध्यापकांनी मुद्द्यांची माहिती दिल्यावरही तो रकाना कोरा सोडण्यात आला.
  • इतकेच नाही तर मूल्यांकनाचे गुणदान करताना पेन्सीलने नोंद घेतली. तसेच मूल्यांकन तक्त्यावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरीही घेतली नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे

Web Title: The school should be re-evaluated, otherwise will protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा