सीएम कार्यालय कर्मचाऱ्यांनी व्यापला मंच, साहित्यिक मागच्या रांगेत; मंत्रिमंडळाची बैठक की साहित्य संमेलनाचे उद्घाटन?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 10:45 AM2023-02-04T10:45:19+5:302023-02-04T10:46:10+5:30

Marathi Sahitya Sammelan: राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी (जि. वर्धा)  ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात दुसऱ्या रांगेत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीच मंचावर ताबा घेतल्याचे चित्र खटकणारे होते.  

The stage was occupied by the CM's office staff, the literati in the back row; Cabinet meeting or Sahitya Samelan inauguration? | सीएम कार्यालय कर्मचाऱ्यांनी व्यापला मंच, साहित्यिक मागच्या रांगेत; मंत्रिमंडळाची बैठक की साहित्य संमेलनाचे उद्घाटन?

सीएम कार्यालय कर्मचाऱ्यांनी व्यापला मंच, साहित्यिक मागच्या रांगेत; मंत्रिमंडळाची बैठक की साहित्य संमेलनाचे उद्घाटन?

Next

- अभिनय खोपडे
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी (जि. वर्धा)  ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात दुसऱ्या रांगेत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीच मंचावर ताबा घेतल्याचे चित्र खटकणारे होते.  महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना तिसऱ्या रांगेत बसावे लागले. मात्र, सरकारच्या अनुदानावर आयोजन असल्याने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यालाही मूक संमती  देत मौन पाळल्याचे दिसून आले. उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री कार्यालयाचे कर्मचारी आल्याने त्यांनाही मंचावर स्थान देण्यात आले. ही मंत्रिमंडळाची बैठक आहे की, साहित्य संमेलनाचे उद्घाटन, असा प्रश्न  चर्चिला जात होता.

संमेलनासाठी राज्य शासनाने पहिल्यांदा ५० लाख व त्यानंतर दोन कोटी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संमेलनावर राज्य सरकार व भाजप अशा दोन्ही आघाड्यांचा पगडा दिसून येत होता, अशी जाहीर टीकाही झाली. मध्यंतरी राज्यात अनेक साहित्यिकांनी राजीनामे देऊन सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेधही नोंदविला होता. या साऱ्या घटनांचे पडसाद साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात दिसून आले. स्वत: शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही आपल्या मार्गदर्शनात याचा उल्लेख केला. 

संमेलनातील किस्से....

अन् पाहुण्यांची खुर्ची पडली...
उद्घाटनाकरिता मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री नियोजित कार्यक्रमापेक्षा दीड तास उशिराने पोहोचले. त्यामुळे इतरांना व्यासपीठावर त्यांची प्रतीक्षा करावी लागली. मंत्रिमहोदयांची एन्ट्री होताच व्यासपीठावर लगबग सुरू झाली. पहिल्या रांगेत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, स्वागताध्यक्ष, संमेलनाध्यक्ष, आदी मान्यवर विराजमान झाले. त्यानंतर दुसऱ्या रांगेतील खुर्चीवर मुख्यमंत्र्यांच्या मागे बसण्यासाठी गेलेल्या महोदयांची खुर्चीच पडली. त्यामुळे काहीशी धावपळ उडाली आणि त्यांना लगेच दुसरी खुर्ची देण्यात आली.
साउंड सीस्टिमनेही सोडली साथ!
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच सभामंडपामध्ये काही विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना पोलिस ठाण्यात नेले. या गोंधळाने मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरही परिणाम झाला. असे असतानाच अचानक मोठ्या साउंडचे स्पीकरही काही वेळेकरिता बंद पडल्याने आणखीनच गोंधळ झाला. 

माझं नाही, आधी संमेलनाध्यक्षांचे स्वागत करा!
आयोजकांच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याची सूचना निवेदिकेने केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘आधी माझं नाही, तर संमेलनाध्यक्षांचं स्वागत करा,’ अशी विनंती केली. परंतु मानानुसार मुख्यमंत्र्यांचे स्वागत झाल्यानंतर विद्यमान संमेलनाध्यक्ष व मावळते संमेलनाध्यक्ष यांचे आयोजकांच्या वतीने आणि शासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
स्वागताध्यक्षांचा उत्साह
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी खासदार दत्ता मेघे यांची नियुक्ती करण्यात आली होती. वयाची ८० वर्षे पार केल्यानंतरही त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून संमेलनात हजेरी लावली आहे. त्यांनी वेळेत उपस्थित राहून स्वागताध्यक्ष म्हणून भाषणही केले.

१७ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन
वर्धा : विद्रोह सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्यावतीने १७ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन शनिवारी (दि. ४) व रविवारी (दि. ५) कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरी सर्कस ग्राउंड वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे. ४ फेब्रुवारीला शनिवारी या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सिनेअभिनेत्री रसिका आगासे-अय्युब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ संपादक व शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे, मावळते संमेलनाध्यक्ष गणेश विसपुते उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, रणजित मेश्राम आदी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: The stage was occupied by the CM's office staff, the literati in the back row; Cabinet meeting or Sahitya Samelan inauguration?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.