अपघातास ट्रॅव्हल्स मालकही दोषी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! पालकांच्या मागण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 06:47 PM2023-07-10T18:47:01+5:302023-07-10T18:47:38+5:30
Wardha News बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताला चालकाइतकाच ट्रॅव्हल्स मालकही जबाबदार आहे. त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वर्ध्यातील मृतांच्या कुटुंबाने एका बैठकीत केली आहे.
वर्धा : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु या अपघाताला चालकाइतकाच ट्रॅव्हल्स मालकही जबाबदार आहे. पोलिस अधिकारी भास्कर दरणे यांच्या पत्नीच्या नावाने ही ट्रॅव्हल्स असून त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वर्ध्यातील मृतांच्या कुटुंबाने एका बैठकीत केली आहे.
या ट्रॅव्हल्स अपघातात वर्ध्यातील १४ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्ताने जात असलेल्या युवक-युवतींची संख्या मोठी आहे. परिवाराचा आधारच हिरावल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर शासनाने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. मात्र अद्यापही शासनाकडून योग्य मदत आणि कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने मृतांच्या पालकांची संयुक्त बैठक घेतली.
या बैठकीत ट्रॅव्हल्स एजन्सीचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाशी असलेली साठगाठ यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रत्येकाच्या घरातील आधार हिरावल्याने मृताच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी. ट्रॅव्हल्सचे नियम आणखी कडक करून वाहनाची वेगमर्यादा निश्चित करावी. समृद्धी महामार्गावर थांबा घेण्याची व्यवस्था करण्यात यावी. चालक मद्यप्राशन करीत असल्याची माहिती ट्रॅव्हल्स मालकाला असतानाही त्यांनी त्याच्यावर जबाबदारी सोपवून २४ प्रवाशांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. त्यामुळे याप्रकरणी एक चौकशी समिती नेमून या घटनेची सखोल चौकशी करून चालक आणि मालकांवर कठोर कारवाई करावी, अशा अनेक मागण्या मृतांच्या पालकांनी यावेळी केल्या. बैठकीला नीलिमा खोडे, सौरभ वंजारी, विशाल वंजारी, मदन वंजारी, अनुप राजूरकर, ओमप्रकाश गांडोळे, रामदास पोकळे, दिनकर खेलकर, निलू तायडे, मेघना तायडे, राजेश कामडी, सपना कामडी, साक्षी पोहनकर व शार्दुल वांदिले आदींची उपस्थिती होती.
तुमचे दु:ख चार दिवसांचे, माझी संपूर्ण गाडी जळाली!
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मृत प्रथमेश खोडे याची आई नीलिमा खोडे यांनी सर्वप्रथम ट्रॅव्हल्स मालकाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला होता. यावर, ‘तुमचे दु:ख फक्त चार दिवसांचे आहे. माझी संपूर्ण गाडी जळाली,’ असे उद्धटपणे उत्तर देऊन त्यांनी फोन कट केल्याचे या बैठकीदरम्यान नीलिमा खोडे यांनी सांगितले.