अल्पवयीन साळीवर मातृत्व लादणारा जावई कारागृहात करेल सक्तमजुरी; न्यायालयाने दंडासह ठोठावला दहा वर्षांचा सश्रम कारावास
By महेश सायखेडे | Published: December 14, 2022 06:42 PM2022-12-14T18:42:23+5:302022-12-14T18:42:58+5:30
वर्धा न्यायालयाने अल्पवयीन साळीवर मातृत्व लादणाऱ्याला दंडासह दहा वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला.
वर्धा : चक्क एक महिना अल्पवयीन साळीचे शारीरिक शोषण करून तिला गर्भवती करीत तिच्यावर थेट मातृत्व लादण्यात आले. साळी-जावई या नात्याला काळिमा फासणाऱ्या प्रकरणातील आरोपी जावयास वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दोषी ठरवून त्यास दहा वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
अल्पवयीन साळीचे शारीरिक शोषण करून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या नराधम जावयास न्यायाधीशांनी भादंविच्या कलम ३७६ (२) (एन) (एफ) अन्वये दहा वर्षांचा सश्रम कारावास तसेच पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच पीडितेला तिच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने नियमानुसार नुकसान भरपाई देण्याचेही आदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणला दिले आहे.
बॉक्स
उपचारासाठी गेली होती बहिणीच्या घरी
दहावीचे शिक्षण घेणारी पीडिता ही प्रकृती ठीक राहत नसल्याने तज्ज्ञांकडून औषधोपचार घेण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून पीडिता ही तिच्या मोठ्या बहिणीकडे राहायला गेली होती. तर आरोपीने जिवे मारण्याची धमकी देऊन पीडितेचे वेळोवेळी शारीरिक शोषण केले.
गर्भवती बहीण झोपायची बाहेरील खोलीत
पीडितेची बहीण गर्भवती झाल्याने ती बाहेरच्या खोलीत झोपत होती. तर पीडिता व पीडितेचे जावई हे घरातील स्वयंपाक खोलीत झोपत होते. याच दरम्यान, नराधम जावयाने साळीचे वेळोवेळी शारीरिक शोषण केले; पण सुरुवातीला त्याची साधी माहितीही पीडितेच्या कुटुंबीयांनाही झाली नाही.
प्रकृर्ती आणखी बिघडल्यावर फुटले बिंग
आरोपीने पीडिताला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर तब्बल एक महिना वारंवार अत्याचार केला. अशातच पीडितेची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला तिच्या वडिलांनी घरी आणले. अशातच मासिक पाळी येत नसल्याने तिला नागपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याचे पुढे आले. डॉक्टरांनी याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना देताच त्यांनाही धक्काच बसला.
गोंडस मुलाला दिला जन्म
मुलगी गर्भवती असल्याचे कळताच जणू पीडितेच्या कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच सरकली. बदनामीच्या भीतीपोटी पीडितेच्या कुटुंबीयांनी पीडितेला गर्भपात करण्यासाठी दुसऱ्या महिला डॉक्टरकडे नेले; पण डॉक्टरांनी तिचा गर्भपात होऊ शकत नाही, असे पीडितेच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यांनतर पीडिताने नागपूर येथील रुग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला.
बॉक्स
गोंडस बाळाची झाली अनाथालयात रवानगी
घटनेच्यावेळी पीडिता ही केवळ १५ वर्षांची असल्याने तिने जन्म दिलेल्या गोंडस बाळाला अनाथालयात देण्यात आले. त्यानंतर संबंधित घटनेची तक्रार पीडितेच्या कुटुंबीयांनी कोंढाळी येथील पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी कारंजा पोलिसांकडे वळते करण्यात आले होते.
१५ साक्षीदारांची तपासली साक्ष
नात्यालाच काळिमा फासणाऱ्या या गंभीर प्रकरणाचा तपास कारंजा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक प्रदीपकुमार राठोड यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार अशोक सोनटक्के यांनी काम पाहिले. याप्रकरणी न्यायालयात एकूण १५ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि विविध पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली आहे.