बोर व्याघ्रतील पाणवठ्यांनी तहान भागली, वन्यप्राण्यांची गावाकडे येणारी धाव थांबली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 05:00 AM2022-05-04T05:00:00+5:302022-05-04T05:00:29+5:30
वन्यप्राण्यांची बरीच संख्या आहे. ते पाण्याच्या शोधत जाऊन उघड्या विहिरीत पडण्याच्याही घटना वाढतात. यासह मनुष्य आणि पाळीव जनावरांवरही हल्ले होतात. हे टाळण्यासाठी उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहायक उपवनसंरक्षक बोबडे यांच्या निर्देशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांच्या नेतृत्वात आर्वी वन परिक्षेत्रातील प्रत्येक नियत क्षेत्रात एक याप्रमाणे पाणवठे तयार केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा वन विभागातील आर्वी वन परिक्षेत्रांतर्गत बोर व्याघ्र प्रकल्पाचं बफर क्षेत्र मोडत असल्याने, या परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. या घनदाट वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचाही अधिवास मोठा आहे. आता तापत्या उन्हामुळे वन्यप्राण्यांच्याही जीवाची काहिली होत असून, त्यांना पाणी मिळाले नाही तर ते गावाकडे धाव घेतात. मात्र, वन विभागाने वनक्षेत्रात पाणवठ्यांची सोय करून त्यामध्ये सोलर पंप व टँकरद्वारे नियमित पाणी टाकले जात असल्याने वन्यप्राण्यांची तहान भागली. परिणामी, गावाकडे धाव घेऊन होणारा मानव-वन्यजीव संघर्षही थांबला आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती सुरू होते. या क्षेत्रामध्ये वाघ, बिबट, अस्वल, चितळ, सांबर, नीलगाय, वानर, मोर, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांची बरीच संख्या आहे. ते पाण्याच्या शोधत जाऊन उघड्या विहिरीत पडण्याच्याही घटना वाढतात. यासह मनुष्य आणि पाळीव जनावरांवरही हल्ले होतात. हे टाळण्यासाठी उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहायक उपवनसंरक्षक बोबडे यांच्या निर्देशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांच्या नेतृत्वात आर्वी वन परिक्षेत्रातील प्रत्येक नियत क्षेत्रात एक याप्रमाणे पाणवठे तयार केले.
काही ठिकाणी नैसर्गिक झऱ्यातील गाळ उपसण्यात आला आहे तर काही वनतलावाचे खोलीकरण करुन पुनरुज्जीवित करण्यात आले. यावर्षी वनकर्मचारी व गावकरी यांच्या श्रमदानातून अत्यंत कमी किमतीत १० अस्थायी पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली.
पाणवठ्यावर पाण्याकरिता वन्यप्राणी एकत्र येत असल्याने त्यांची शिकार होण्याचा धोका असतो. हा धोका लक्षात घेवून वनविभागच्या कर्मचाऱ्यांनी या वनपरिक्षेत्रातील सर्व पाणवठ्यांवर कॅमेरा ट्रॅप लावला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्याचे नियमितपणे मॉनिटरिंग केली जात आहे.
अस्थायी पाणवठ्यासाठी थोडी जमीन बशीच्या आकाराची खोदून त्यावर गवत आच्छादलेले असते. त्यावर ताडपत्री पसरवून शेवटी वरून दगडाची पिचिंग करायची असते. या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होत असल्याने अत्यंत कमी किमतीत हा पाणवठा तयार होतो. तो पाणवठाही नैसर्गिक वाटत असल्याने वन्यप्राणीही त्यालाच पसंती देतात.
- नितीन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, आर्वी