मजूर मिळाले नाही तरी नो टेन्शन; आता रोबो करणार निंदण, शेतकऱ्यांचा खर्च वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 10:59 AM2023-09-02T10:59:06+5:302023-09-02T11:01:37+5:30
सिंदी (रेल्वे) च्या सुपुत्राचा आविष्कार
प्रशांत कलोडे
सिंदी (रेल्वे) (वर्धा) : शेतकऱ्यांना शेतात वाढलेल्या तणाची समस्या सातत्याने भेडसावत असते. हंगामात मजुरांची वानवा असल्याने मजुरांवर अतिरिक्त खर्च करावा लागतो. बरेचदा मजुरांच्या प्रतीक्षेत शेतातील पिकांमध्ये तण आणखीच वाढत जाते. आता निंदणाकरिता मजूर मिळाले नाही तर शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाच्या दोन प्राध्यापकांनी यावर चक्क ‘तणनाशक रोबोट’ हा पर्याय शोधून काढला आहे. अत्यंत प्रभावी आणि कमी खर्चिक असलेल्या या उपकरणामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तण केवळ पिकांसाठीच नव्हे तर, ते मानवांसाठी उपयुक्त नाहीत. ते झाडाच्या वाढीवर परिणाम करतात आणि ते काढून टाकणे आवश्यक असते. याकरिता वेळेवर मजूरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी फरपट होते. शेतकऱ्यांच्या या समस्येचा अभ्यास करून नागपूरच्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील प्रा. विजय ठाकरे व डॉ. संदीप खेडकर यांनी ‘तणनाशक रोबोट’ची संकल्पना मांडली. मात्र, शेतकऱ्यांना परवडणारे तंत्रज्ञान देणे हे आव्हान त्यांच्यासमोर असताना त्या आव्हानाला पेलून त्यांनी अत्यंत कमी खर्चिक आणि सोलरवर चालणाऱ्या रोबोटची निर्मिती केली. त्यामुळे शेतकऱ्यांना तण काढण्यासाठी ‘मॅन्युअली ऑपरेटिंग टूल्स’चा स्वस्त आणि उत्तम स्वयंचलित पर्याय उपलब्ध करून देता येणे शक्य झाले. यातील संशोधक डॉ. संदीप खेडकर हे सिंदी (रेल्वे) येथील रहिवासी असून या उपकरणामुळे सिंदीवासींनीही कौतुक केले.
सेन्सर ओळखणार शेतातील अडथळे
या तंत्रज्ञानासाठी प्राध्यापकांनी पेटंटसाठी नोंदणीही केली आहे. उपयुक्त शेतकऱ्यांच्या खुरपणीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रभावी, स्वस्त आणि स्वयंचलित मार्ग शोधणे हे ‘तणनाशक रोबोट’चे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये स्वायत्त पोर्टेबल वीड कटर, बॅटरी सेन्सर, कटर, रिचार्जेबल बॅटरी, डीसी मोटार इत्यादींचा वापर केला आहे. सेन्सर्सद्वारे शेतामधील अडथळे ओळखण्यास मदत होणार असून त्यानुसार रोबोट आपले काम व्यवस्थित करेल. इतर सेन्सर तण शोधून ते कटरच्या साहाय्याने काढून टाकतील. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय असमान भूभागावर जाण्यासाठी वाहनाची रचना करण्यात आली आहे.
रोबोटमध्ये बॅटरीचा वापर करण्यात आला असून ते सोलरवरही चालते. त्यामुळे हे उपकरण पर्यावरणपूरक आहे. विशेष म्हणजे, वेळेची बचत होते. दुसरीकडे तण काढण्यासाठी मजुरांवरील खर्चापेक्षा कमी खर्च होणार आहे. शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या मोठ्या समस्यांचे समाधान सुलभतेने करता येईल.
- डॉ. संदीप खेडकर, संशोधक