बदमाश मुलांसोबत का राहतोस? आई रागावल्याने तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 04:28 PM2022-04-16T16:28:04+5:302022-04-16T16:36:25+5:30
हर्षलला त्याची आई पूजा जुमडे यांनी तू वॉर्डातील बदमाश मुलांसोबत का राहतो, असे म्हणून चांगलेच रागावले. हर्षलला आईने रागाविलेले सहन झाले नाही व त्याने टोकाचे पाऊल उचलले.
वर्धा : आपल्या मुलाची चांगल्या मित्रांशी संगत असावी, असे प्रत्येक पालकांना वाटते; मात्र पाल्य जेव्हा आपल्याच आई-वडिलांना चुकीचे ठरवितात तेव्हा त्या आई वडिलांच्या काळजाचा ठोकाच चुकतो, असाच प्रकार सिंदी मेघे परिसरातील डेहनकर लेआऊट परिसरात घडला.
एका २३ वर्षीय मुलाने आईच्या रागावर राहत्या घरी चक्क नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या करून जीवन संपविले; अन् आई-वडिलांच्या पाया खालची वाळूच सरकली. हर्षल पंढरीनाथ जुमडे (२३) असे मृतक युवकाचे नाव आहे.
हर्षल हा परिसरातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांसोबत राहत होता. सर्वाधिक वेळ तो त्यांच्यासोबतच घालवत होता. त्यामुळे हर्षलची आई अनेकदा त्याला अशा मुलांसोबत मैत्री नको करू, बोलत नको जाऊ असे सांगत होती. १४ रोजी हर्षलला त्याची आई पूजा जुमडे यांनी तू वॉर्डातील बदमाश मुलांसोबत का राहतो, असे म्हणून चांगलेच रागावले; पण हर्षलला आईने रागाविलेले सहन झाले नाही आणि त्याने राहत्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
त्याच्या आत्महत्येची माहिती घरच्यांना मिळताच आई-वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. याप्रकरणी पूजा जुमडे यांनी रामनगर पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून हर्षलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.